rape and Atrocities against married man by a college girl | लग्नाचे आमिष देत महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार, विवाहित तरुणावर अंबाजोगाई येथे गुन्हा दाखल

ठळक मुद्देपिडीता लातूर येथील एका प्रख्यात महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षाला आहे. पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी तिने काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथे एका खाजगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतला होता. येथेच तिची राज सोबत ओळख झाली

अंबाजोगाई : स्वतः विवाहित असतानाही एका अविवाहित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी  राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर या तरुणावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात बलात्कार आणि एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथील रहिवासी असून विवाहित आहे. 

याप्रकरणी लातूर जिल्ह्यातील २२ वर्षीय पिडीतेने फिर्यादीत नमूद केल्यानुसार,  ती लातूर येथील एका प्रख्यात महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षाला आहे. पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी तिने काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथे एका खाजगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतला होता. याठिकाणी तिच्यासोबत प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला भेटण्यासाठी त्याचा मावस भाऊ राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर हा नेहमी येत असे. येथेच तिची राज सोबत ओळख झाली आणि त्यानंतर  ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. 

दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या मात्र, माझ्या घरचा आपल्या लग्नाला विरोध आहे असे राज ने पिडीतेला सांगितले. तसेच फेब्रुवारीमध्ये पिडीतेला शेपवाडी येथील  बहिणीच्या घरी नेऊन त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर पीडिता गर्भवती राहिली असता दि. २७ जून रोजी राजने नारळाच्या पाण्यातून काहीतरी दिल्याने तिचा गर्भपात झाला.यानंतर पिडीतेला त्रास होऊ लागल्याने राजने तिला माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. 

२०१० सालीच राज विवाहित 
याच दरम्यान गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी पिडीतेने नाकलगाव गाठून राजच्या आई वडिलांची भेट घेतली. परंतु, त्यांनी राजचे लग्न २०१० सालीच झाल्याचे सांगून राजसोबत तिचे लग्न लावण्यास नकार दिला. तरी देखील राजने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करतो असे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. परंतु, नंतर राजची मानसिकता लक्षात आल्याने पिडीतेने त्याच्यासोबत लग्न करण्यास स्वतःहून नकार दिला. यावर राजने पिडीतेस मी आपले आक्षेपार्ह्य अवस्थेतील फोटो सोशल मिडीयावर टाकून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली व त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास बजावले. 

त्यानंतर दि. २८ डिसेंबर रोजी फोटो देण्याच्या बहाण्याने राजने पिडीतेला अंबाजोगाईला आणले. येथे आल्यास माझ्याशी लग्न का करत नाहीस म्हणून पिडीतेला मारहाण करून पुन्हा लातूरला सोडले. यासोबतच तिच्या वडिलांनाही शिवीगाळ केली. या सर्व प्रकाराने व्यथित झालेल्या पिडीतेने अखेर अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठले आणि राज विटेकरच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर याच्यावर कलम ३७६, ३१२, ३२३, ५०६ आणि अ.जा.ज.अ.प्र.अ.कलम ३(१)(१२) अन्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात आज पहाटे गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद हे करत आहेत.

शिक्षणासाठी आलेल्या मुली असुरक्षित  
शहरात वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या बेकायदेशीर खाजगी क्लासेसचे पेव फुटले आहे. यात शिकण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींची मोठी संख्या आहे. परंतु, त्यांच्या सुरक्षेची कुठलीही काळजी घेण्यात येत नाही. त्यामुळे अशा क्लासेसच्या संपर्कात असणाऱ्या रोड रोमियोंचे फावत असून निष्पाप मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.


Web Title: rape and Atrocities against married man by a college girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.