गर्भपातासाठी सासरच्यांकडून विवाहितेवर दबाव; नकार दिल्याने केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:08 PM2019-04-12T18:08:34+5:302019-04-12T18:09:56+5:30

केज पोलिसांनी याची माहिती लपविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो माध्यमांनी हाणून पाडला.

pressure on married women for miscarriage in Beed district | गर्भपातासाठी सासरच्यांकडून विवाहितेवर दबाव; नकार दिल्याने केली मारहाण

गर्भपातासाठी सासरच्यांकडून विवाहितेवर दबाव; नकार दिल्याने केली मारहाण

googlenewsNext

बीड : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा एकीकडे दिला जात असताना दुसऱ्या बाजुला मात्र आजही गर्भपाताचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. एका विवाहितेस सासरच्यांनी गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. मात्र गर्भपातास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पीडिता केज ठाण्यात गेली. येथे सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, केज पोलिसांनी याची माहिती लपविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो माध्यमांनी हाणून पाडला.

आशाबाई उर्फ मिरा भास्कर चांदणे (२९ रा. परडी माटेगाव ता.वडवणी) असे या विवाहितेचे नाव आहे. भास्करची पहिली पत्नी मयत झालेली असून तिच्यापासून त्याला दोन मुले आहेत. पहिली पत्नी मयत झाल्याने २०१६ साली आशाबाईचा विवाह भास्करसोबत झाला होता. सुरूवातीला काही दिवस आशाबाईला चांगले नांदविले. त्यांना एक राजनंदिनी नावाची मुलगीही झाली. मात्र नंतर काहीतरी कारणे सांगून आशाबाईचा छळ सुरू झाला. परिस्थिती हलाकिची असल्याने आई-वडिलांना त्रास नको म्हणून त्यांनी हा त्रास सहन केला. 

पुन्हा आशाबाई गर्भवती राहिली. यावेळी मात्र भास्करसह सासू साखराबाई, सासरा महादेव, दीर बाळू आणि जाऊ शोभा यांनी तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. नुसता गर्भपातच नाही तर यासाठी माहेरहून ५० हजार रूपये घेऊन ये, म्हणत तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला घराबाहेर हाकलून दिले. आशाबाईने थेट पोलीस ठाणे गाठण्याऐवजी महिला तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. मात्र येथे प्रकरण मिटले नाही. नंतर केज पोलीस ठाणे गाठून सासरच्यांविरोधात फिर्याद दिली. तपास पोना राणी मेंगडे या करीत आहेत.

केज पोलिसांची माहिती देण्यास टाळाटाळ
गर्भपात, स्त्रीभ्रूण हत्या, गर्भातील पिशवी काढणे यासारख्या घटनांमुळे बीड जिल्हा चर्चेत आला आहे. गर्भपातासारखा उल्लेख आल्याने याची माहिती घेण्यासाठी केज ठाण्यात संपर्क केला. मात्र लँडलाईन फोन बंद होता. पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या बंदोबस्तामध्ये आहे. त्यानंतर दोन ठाणे अंमलदारांच्या मोबाईलवर संपर्क केला. यामध्ये अंमलदार हे ठाणे सोडून बाजुच्या कॉलनीत फेरफटका मारत होते. आपण १५ मिनीटांनी ठाण्यात जाऊ, असे सांगितले. या सर्व परिस्थितीवरून केज पोलिसांकडून ही माहिती दडपून आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र माध्यमांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला.

Web Title: pressure on married women for miscarriage in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.