पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणखी एक हत्या टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:03 AM2019-01-22T00:03:09+5:302019-01-22T00:03:45+5:30

करणीच्या संशयावरुन शेजारणीला संपवल्यानंतर पत्नीलाही संपविण्यासाठी निघालेल्या अशोक जंगले या आरोपीला पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. १० मिनिटेही उशीर झाला असता तर तो पसार होऊन पुण्यात जाऊन आपल्या पत्नीचीही हत्या करणार होता. हा उलगडा पोलीस तपासातून झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची हत्या टळली आहे.

Police warnings prevented another murder | पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणखी एक हत्या टळली

पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणखी एक हत्या टळली

Next
ठळक मुद्देपेठ बीड खून प्रकरण : शेजारणीला संपवून बायकोच्या हत्येसाठी निघाला होता खुनातील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : करणीच्या संशयावरुन शेजारणीला संपवल्यानंतर पत्नीलाही संपविण्यासाठी निघालेल्या अशोक जंगले या आरोपीला पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. १० मिनिटेही उशीर झाला असता तर तो पसार होऊन पुण्यात जाऊन आपल्या पत्नीचीही हत्या करणार होता. हा उलगडा पोलीस तपासातून झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची हत्या टळली आहे.
शीलावती गिरी (५०, रा. अयोध्यानगर, बीड) या महिलेचा शेजारीच राहणाऱ्या अशोक जंगले याने शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बतईने गळा चिरुन हत्या केली होती. त्यानंतर तो फरार होऊन बीड तालुक्यातील इरगाव येथे आपल्या काकाच्या गावी गेला. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तो पाडळशिंगीकडे पायी निघाला. हायवेला पोहोचून तो पुण्याला जाणार होता. १० मिनिटांवर हायवे असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयात हजर केले. २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी वेळोवेळी तपासाबाबत सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बी. एस. बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. कैलास लहाने यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी गुन्ह्यातील दुचाकी, हत्यार व अशोकचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत.
दरम्यान, शीलावती यांनी घरावर करणी केली. त्यामुळेच आपला संसार उद्धवस्त झाला. यातूनच अशोकने शीलावती यांची हत्या केली. पत्नी अंजली जंगले ही आपल्यासोबत नांदत नसल्याने तो संतापला होता. शीलावती यांची हत्या करण्यापूर्वी सकाळी त्याचे अंजलीसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्याने तिला संपविण्याची फोनवरुन धमकीही दिली होती. मात्र, अंजलीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर काही तासांनीच अशोकने शीलावती यांचा काटा काढला. अंजलीची हत्या करण्यासाठी तो पुण्याकडे निघाला होता. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत त्याला बेड्या ठोकल्या. त्यामुळे अंजलीचा जीव बचावला. हा सर्व प्रकार तपासातून समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
अंजली मुलांसोबत असते पुण्यात
अंजली व अशोक यांना दोन मुले आहेत. दोघातील वादांमुळे अंजली पुण्यात राहत होती. केटरींगचे काम करुन ती उदरनिर्वाह भागवत होती. अशोकला अंजलीचा पत्ता माहीत होता. शनिवारी रात्री तो पुण्याला जाणार होता. रागाच्या भरात तिची हत्या करणार होता, असे सूत्रांकडून समजते.
२४ तासात ३ खुनांमुळे हादरला होता बीड जिल्हा
शनिवारी अवघ्या २४ तासात तब्बल ३ खुनांमुळे जिल्हा हादरला होता. याच दिवशी चौथाही खून होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो टळला. या तिन्ही गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: Police warnings prevented another murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.