बीडमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, अमरसिह पंडित नाराज; मेळावा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 11:49 AM2019-03-16T11:49:39+5:302019-03-16T11:50:31+5:30

बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी अनपेक्षित जाहीर करून संपूर्ण बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का दिला.

NCP creat dispute after release name of bajrang sonavane for lok sabha beed | बीडमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, अमरसिह पंडित नाराज; मेळावा रद्द

बीडमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, अमरसिह पंडित नाराज; मेळावा रद्द

googlenewsNext

सतीश जोशी  

बीड : ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार अमरसिंह पंडित नाराज झाले आहेत. उमेदवारी मिळणार हे गृहित धरून गेवराईसह मतदार संघात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शनिवारी, रविवारी आयोजित कार्यकर्त्यांचे मेळावे केले होते. राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर होताच गेवराईतील शनिवारी सायंकाळी होणारा कार्यकर्ता मेळावा रद्द झाला. अमरसिंह पंडित यांचा गेवराई मतदार संघ येतो. लोकसभेची त्यांनी मन लावून तयारी केली होती. शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेत असलेले नाव ऐनवेळी कटल्याने त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आहे. ही नाराजी म्हणून मेळावा रद्द करून पक्षश्रेष्ठींना एकप्रकारे इशाराच दिला आहे. 

सोनवणेंची अनपेक्षित उमेदवारी

बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी अनपेक्षित जाहीर करून संपूर्ण बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का दिला. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले बजरंग सोनवणे आणि भाजपाच्या डॉ.प्रीतम मुंडे यांच्यातील लढतीबद्दल सोशल मीडियावर घमासान चालू असून शंका, कुशंका घेण्यात येत आहेत. बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते स्वत: आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. यापूर्वीही बजरंग सोनवणे यांनी बीड जि.प.चे शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद भूषिवले. बजरंग सोनवणे यांच्या ताब्यात केज खरेदी विक्री संघ असून येडेश्वरी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. धंनजय मुंडे यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासोबतच सोनवणे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशच केला नाही. बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना हटवून जिल्हाध्यक्षही मिळविले आहे. भाजपाची सत्ता असतानाही सोनवणे यांना 21 कोटी रुपयांचा निधी दिला गेला, याबद्दलही पक्षांतर्गत नाराजी व्यक्त होती. राजकारणी नेत्यापेक्षा उद्योजक, कंत्राटदार अशी त्यांची जास्त ओळख आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडीसाठी गुरुवारी मुंबईत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षश्रेष्ठींची बैठक झाली. या अतिमहत्त्वाच्या बैठकीस पक्षाचे विधीमंडळातील उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर हे अनुपस्थित राहिल्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असतानाच सोनवणे यांची उमेदवारी जिल्ह्याला धक्का देणारी आहे. या बैठकीत माजी आ.अमरसिंह पंडित आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे या दोनच नावावर चर्चा झाली असली तरी तुल्यबळ उमेदवार म्हणून अमरसिंह पंडितांच्याच नावावर या बैठकीत अधिक जोर होता. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर अमरसिंह यांची देखील ही निवडणूक सर्व ताकदीने लढण्याची तयारी होती. मोठ्या निवडणुकांचा अनुभव, साखर कारखाना, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून असणारी यंत्रणा ह्या बाबी पंडितांच्या दृष्टीने जमेच्या असताना देखील ऐनवेळी

अंतर्गत गटबाजीमुळे त्यांचे नाव कटले.

पक्षाचे उपनेते जयदत्त क्षीरसागर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित या नावांची संभाव्य उमेदवार म्हणून प्रमुख चर्चा होती. परंतु, जयदत्त क्षीरसागरांनी लोकसभा लढविण्यास यापूर्वीच स्पष्ट नकार दिला होता. धनंजय मुंडे हे पक्षाचे प्रमुख स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांना जिल्ह्यातच अडकून ठेवणे पक्षाला कदाचित उचित वाटले नसावे. आता एकमेव नाव अमरसिंह पंडित यांचेच उरले होते आणि त्यांनीही लढण्याची तयारी केली होती.

चर्चेला उधाण
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमास पंकजा मुंडे ह्याही उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पवारांनी गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानला 50 लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा कार्यक्रम आणि देणगी याबद्दल जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. एक महिन्यापूर्वीच बजरंग सोनवणे यांनी लोकसभेचा संभाव्य उमेदवार म्हणून आपल्या भागात जनसंपर्क वाढविला होता. तरीही जिल्ह्याला विश्वास वाटला नाही आणि अमरसिंह पंडित हेच उमेदवार जिल्ह्याने गृहित धरले होते. तसे कुणीही स्वत:हून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली नाही. भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ.प्रीतम मुंडे ह्या मातब्बर उमेदवार असून भाजपाने विजयाची हॅटट्रिक केली आहे. बजरंग सोनवणे यांना उमेदवारीच्या घोड्यावर बसवून जिल्ह्यातील ह्या मातब्बरांनी आपली सुटका करून घेतली, अशीही चर्चा जोर धरत आहे.
 

Web Title: NCP creat dispute after release name of bajrang sonavane for lok sabha beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.