बीड जिल्ह्यातील एकूण पशुधनापेक्षा छावणीतील जनावरांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:49 PM2019-04-09T23:49:18+5:302019-04-09T23:51:38+5:30

जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज घडीला ८७२ चारा छावण्यांना मंजुरी असून, त्यापैकी ५६२ चारा छावण्या सुरु आहेत. मात्र, छावण्यांवरील जनावरांची संख्या ही पशुधनापेक्षा जास्त झाल्यामुळे संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना नोटीस देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

More than the total number of cattle in Beed district | बीड जिल्ह्यातील एकूण पशुधनापेक्षा छावणीतील जनावरांची संख्या जास्त

बीड जिल्ह्यातील एकूण पशुधनापेक्षा छावणीतील जनावरांची संख्या जास्त

Next
ठळक मुद्देउपविभागीय अधिकारी, तलाठ्यांना दिली जाणार नोटीस : भरारी पथकाच्या अहवालावर कारवाईची प्रतीक्षा

बीड : जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज घडीला ८७२ चारा छावण्यांना मंजुरी असून, त्यापैकी ५६२ चारा छावण्या सुरु आहेत. मात्र, छावण्यांवरील जनावरांची संख्या ही पशुधनापेक्षा जास्त झाल्यामुळे संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना नोटीस देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
चारा छावण्यांची सर्वाधिक संख्या बीड तालुक्यात १८५ व आष्टी तालुक्यात १८० आहे. या दोन्ही तालुक्यातील शासकीय आकडेवाडीनुसार असलेल्या जनावरांच्या संख्येपेक्षा छावणी अहवालातील जनावरांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या जनावरांची संख्या अधिक दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत आहे. प्रशासनाचे मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाच्या वतीने चारा छावणीवरील नियंत्रणासाठी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकरी दत्तप्रसाद नडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मात्र, त्यांच्या वतीने तपासणी केलेल्या छावण्यांध्ये गैरप्रकार आढळले असून, त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. मात्र, त्या अहवालावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे होत असलेल्या गैरप्रकारास प्रशासनाकडून अभय आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आष्टी, बीड तालुक्यातील पशुधन
बीड तालुक्यातील लहान मोठ्या जनावरांची संख्या १ लाख १५ हजार ९९१ आहे तर छावणीवरील आज जनावरांची संख्या १ लाख १४ हजार १७२ आहे. अनेक गावांध्ये अजून छावणी देखील सुरु नाही. तसेच राहत शिबिरातील जनावरांची संख्या जवळपास ३ हजार ८०० आहे. तसेच आष्टी तालुक्यातील पशुधन १ लाख २४ हजार ५१० आहे, तर छावणीतील जनावरांची संख्या १ लाख ८ हजार ३१९ आहे. त्या ठिकाणी देखील अनेक गावांध्ये छावण्या सुरु नाहीत. त्यामुळे सर्रासपणे जनावरांची संख्या अधिक दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे.
छावण्यांची मागणी सुरुच
८७२ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर त्यापैकी फक्त ५६२ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच सुरु न केलेल्या २६८ चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत.
तरी देखील अनेक गावांमधून चारा छावण्यांची मागणी होत असून, छावण्या मिळवण्यासाठी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे घालत आहेत. प्रशासनाकडून देखील गरज तपासून तात्काळ मंजुरी देण्यात येत आहे.

Web Title: More than the total number of cattle in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.