बीड जिल्ह्यात कपाशीचे नुकसान जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:36 AM2018-08-20T00:36:31+5:302018-08-20T00:37:51+5:30

The loss of cotton in Beed district is much higher | बीड जिल्ह्यात कपाशीचे नुकसान जास्तच

बीड जिल्ह्यात कपाशीचे नुकसान जास्तच

Next
ठळक मुद्देकृषीच्या पाहणीत आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जादा प्रादुर्भाव

बीड : जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. जिल्ह्यात ३ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीमध्ये बोंडअळीमुळे नुकसानीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अंदाजापेक्षाही अधिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष कृषी विभागाचा आहे. शेतकऱ्यांनी वेळी योग्य उपाय व नियोजन केले नाही तर कापूस पीक संपुष्टात येण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात मोठया प्रमाणात नगदी पीक असल्यामुळे कापूस लागवड केली जाते. संपूर्ण जिल्ह्याचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. मात्र, मागील वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उत्पादनात घट झाली होती. त्यानंतर कृषी विभागाने दक्षता म्हणून कापूस पिकाची लागवड कमी करावी असा सल्ला दिला होता. तसेच डिसेंबर महिन्यापूर्वी शेतातील सर्व कापूस नष्ट करण्यच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अनेक ठिकाणी शेतकºयांनी उपाय योजना न केल्यामुळे यावर्षीही जिल्ह्यात सर्वत्र बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

यावर्षी कापूस उगवल्यानंतर लगेचच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व उत्पादनात घट होऊ नये यासाठी, कृषी विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. शेतकºयांचे होणारे नुकसान किती असेल याचे मापन करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील काही गावांमध्ये कामगंध सापळे लावून नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे.

यावेळी जिल्ह्यात सर्वत्र आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर प्रादुर्भाव दिसून आला आहे. ते रोखण्यासाठी योग्य नियोजन व उपाययोजना केल्या नाहीत, तर शेतकºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. डिसेंबरअखेर शेतातील कापूस पूर्णत: नष्ट न केल्यास पीक पूर्णपणे संपुष्टात येण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कापसाच्या पळहाट्या बांधावर न टाकता त्या जाळून नष्ट कराव्यात, असेही कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

बोंडअळी नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर समिती
ज्या जिल्ह्यांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे त्याठिकाणी राज्य शासनाने १३ आॅगस्ट रोजी अध्यादेश काढून जिल्हास्तरीय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही समिती प्रत्येक १५ दिवसाला संपूर्ण जिल्ह्यातील कापूस पिकाची परिस्थिती व बोंडअळीचा प्रादुर्भाव याविषयी अहवाल देणार आहे.

अहवालातून बोंडअळीमुळे किती उत्पादन घटणार आहे, याविषयी राज्य शासनाला अंदाज येऊन पुढील उपाययोजना राबविण्यासाठी फायदा होणार आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, विद्यापीठाचे वैज्ञानिक, जिल्हा माहिती अधिकारी, कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांचे प्रतिनिधी, जिनिंग मिलचे प्रमुख, बियाणे उत्पादक विक्री संघटनेचा एक प्रतिनिधी, कीटकनाशक - उत्पादक विक्री संघटनेचा एक प्रतिनिधी व कापूस उत्पादक ३ प्रगतशील शेतकरी यांचा समावेश असणार आहे. गतवर्षात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे ही समिती नेमण्यात आली आहे.

दुकानदारांकडून पक्की पावती घ्या
फवारणीसाठी लागणारे किटकनाशक व कामगंध सापळे कृषी केंद्राकडून विकत घेताना शेतकºयांनी पक्क्या पावत्या घ्यावात. पावती देण्यास नकार दिल्यास त्या दुकानदाराची तक्रार संबंधित विभागात करावी.

पावसाने ओढ दिल्याने वाढला प्रादुर्भाव
पावसाने ओढ दिल्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव असताना देखील शेतकºयांनी फवारणी किंवा अन्य उपाययोजना केल्या नाहीत. पिके जगतील की नाही याची शाश्वती नसल्याने फवारणी करण्याकडे टाळाटाळ केली. आणि फवारणी करुनही पाऊस न पडल्यास आर्थिक नुकसान सहन करावा लागेल या भीतीने अनेक शेतकºयांनी उपाययोजना करणे टाळले. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे कृषी विभागाने सांगितले.

प्रत्येक गावामध्ये कृषी विभागाने उपाययोजना काय कराव्यात यासाठी सभा घेतल्या. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. त्यानुसार शेतकºयांनी उपाययोजना केल्या तर बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होऊन नुकसान टाळण्यास मदत होईल.
- एम. एल. चपळे
जिल्हा कृषी अधीक्षक, बीड

कापसाला पाते, फुले, बोंडे लागण्यास सुरुवात झाल्यापासून त्यातील गुलाबी बोंडअळीची अंडी, छिद्र याची शेतकºयांनी नियमित पाहणी करावी. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे तात्काळ कीटकनाशकांची फवारणी करावी.
- बी. एम. गायकवाड
प्रकल्प उपसंचालक, आत्मा, बीड

फवारणी करताना शिफारस नसताना दोन किंवा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारणी करु नये. तसेच फवारणीपूर्वी हातमोजे, गॉगल, अप्रॉन, बूट संरक्षण किटचा वापर करावा. संबंधित कृषी अधिकारी, कर्मचाºयांचा सल्ला घ्यावा.
- दिलीप जाधव
तालुका कृषी अधिकारी बीड

Web Title: The loss of cotton in Beed district is much higher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.