जेसीबी खरेदीसाठी सासरचा जाच; लग्नाला वर्षही न झालेल्या विवाहितेने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:04 PM2019-06-04T15:04:21+5:302019-06-04T15:33:02+5:30

अकरा महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

In-laws' harrasment for purchase of JCB; newly married women commit suicide | जेसीबी खरेदीसाठी सासरचा जाच; लग्नाला वर्षही न झालेल्या विवाहितेने घेतला गळफास

जेसीबी खरेदीसाठी सासरचा जाच; लग्नाला वर्षही न झालेल्या विवाहितेने घेतला गळफास

Next
ठळक मुद्देशिरुरकासार तालुक्यातील राक्षसभुवन येथील घटनाआत्महत्या नसून तिचा घातपात करण्यात आल्याचा माहेरच्यांचा आरोप

बीड : अवघ्या अकरा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान ही आत्महत्या नसून तिचा घातपात करण्यात आला, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला. आरोपींना अटक केली नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला होता.

पोलिसांच्या अश्वासनानंतर नातेवाईक शांत झाले. सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
अमृता उर्फ सतिका शरद तांबे (२० रा.राक्षसभूवन ता.शिरुरकासार) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पौडुंळ क्र.३ (ता.शिरुरकासार) येथील अमृताचा मागील ११ महिन्यापूर्वीच राक्षसभूवन येथील शरद तांबे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिने सुखाने संसार सुरु होता. त्यानंतर अमृताचा पोकलेन खरेदीसाठी माहेरहून पाच लाख घेवून ये, या कारणावरुन पती व सासरच्यांनी शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. तांबे कुटूंबाकडे एक जेसीबी असतानाही अमृताचा पती शरद आणखी एका पोकलेन खरेदीसाठी पत्नीकडे पाच लाख रुपयांची वारंवार मागणी करत होता. सोमवारी सकाळी देखील अमृतानं भावाला फोन करून याबाबत सांगितले होेते. असे असतानाच मंगळवारी पहाटेच्या सुमारास अमृताने सासरी आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सासू आणि पतीने तिला मृतावस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर  तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषीत केले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अमृताचे नातेवाईकही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.

अमृताचा पती आणि सासू पैशांची मागणी करत तिचा छळ करत होते. त्यामुळे तीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत आक्रमक पवीत्रा घेतला. सासरच्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत अमृताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. माहिती मिळाल्यानंतर शिरुर ठाण्याचे पो.नि.सतिश वाघ यांच्यासह कर्मचारी रूग्णालयात आले. योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी सासरच्यांविरोधात छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोनि वाघ यांनी सांगितले. 

Web Title: In-laws' harrasment for purchase of JCB; newly married women commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.