परळी रेल्वे पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग; स्वत:चे वाहनही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:21 PM2019-07-01T12:21:27+5:302019-07-01T12:22:43+5:30

१८ रेल्वे स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीवर कसे ठेवणार नियंत्रण?

Insufficient staff members in Parli railway police station; Not even a vehicle | परळी रेल्वे पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग; स्वत:चे वाहनही नाही

परळी रेल्वे पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग; स्वत:चे वाहनही नाही

Next
ठळक मुद्देपोलीस स्टेशनसाठी ४५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे. २३ पोलीस कर्मचारी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत

परळी (जि.बीड) : बीड जिल्ह्यातील मोठे रेल्वे स्टेशन असलेल्या परळी रेल्वे स्टेशनमधील रेल्वे पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या अपुरी झाली आहे. या ठाण्यासाठी स्वतंत्र असे वाहनही नाही. त्यामुळे तपासाला रेल्वेनेच जाण्याशिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे पर्याय नाही. आहे त्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण येत असून, धावत्या रेल्वेत घडणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास व तपास कामात तत्परता आणण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत.

परळी रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत १८ रेल्वे स्टेशन हद्दीतील धावत्या रेल्वेमधील घटनेकडे लक्ष दिले जाते. यासाठी केवळ २५ कर्मचारी नेमलेले आहेत. या पोलीस स्टेशनसाठी ४५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे. परंतु मंजुर क्षमतेएवढे रेल्वे पोलीस कर्मचारीच उपलब्ध नाही. २३ पोलीस कर्मचारी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहे. सध्या येथे १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ पोलीस उपनिरीक्षक, ११ जमादार, १२ पोलीस कर्मचारी मंजूर आहेत. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ३ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात १ महिला कर्मचारी आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची ७ पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. अपुऱ्या स्टाफवरच १८ रेल्वे स्टेशनमधील घडणाऱ्या घटनेचा तपास करावा लागत आहे.

परळी रेल्वे पोलीस ठाण्याची बीड, परभणी, लातूर या तीन जिल्ह्यात हद्द आहे. यातील परळी रेल्वे स्टेशन, उखळी, वडगाव, गंगाखेड, पोखर्णी, धोंडी, घाटनांदूर, मूर्ती, कारेपूर, पानगाव, जानवळ, लातूर रोड, चाकूर, हेरकुमठा, उदगीर यासह १८ रेल्वे स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीवर  आळा घालण्यासाठी परळी रेल्वे स्टेशनमधून नियोजन केले जाते. हे नियोजन करता करता आहे त्या पोलिसांची तारांबळ होत आहे. रेल्वेचे पोलीस अधिकारी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत, मात्र कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे खाजगीत सांगतात. 

पोलीस बळ वाढल्यास मदत होणार
परळी हे काही रेल्वे गाड्यांचे शेवटचे स्थानक आहे. त्यामुळे लांब अंतरावरुन निघालेल्या या रेल्वेमधून प्रवास करत अनेक मनोरुग्ण, गुन्हेगारी वत्तीचे लोक परळी परिसरात आढळतात. उपविभागीय कार्यालय होऊन पोलीस बळ वाढल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे सुलभ ठरू शकेल.

नेमणुका आणि सीसीटीव्हीच्या मागणीकडे दुर्लक्ष 
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रेल्वेने अनेक राज्यातून भाविक येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये दररोज १८ रेल्वे गाड्या धावतात. त्यामुळे परळी रेल्वे पोलीस स्टेशनमधील रिक्त पदे भरावीत व रेल्वे पोलीस उपअधीक्षक यांचे कार्यालय सुरु करुन नेमणूक करावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. परळी रेल्वे स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही यापूर्वी केलेली आहे. 
- जी. एस. सौंदळे, अध्यक्ष, परळी रेल्वे प्रवासी संघटना

Web Title: Insufficient staff members in Parli railway police station; Not even a vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.