‘फितूर वाटा मोडूनी मी असा चालतो, स्वप्नांचे फास मी गळा घालतो’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:26 PM2018-06-26T14:26:43+5:302018-06-26T14:28:03+5:30

अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनात समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या प्रबोधनाचा झाला जागर  

'I am doing such a violation of frustrated divination, I get caught in the trap of dreams' | ‘फितूर वाटा मोडूनी मी असा चालतो, स्वप्नांचे फास मी गळा घालतो’  

‘फितूर वाटा मोडूनी मी असा चालतो, स्वप्नांचे फास मी गळा घालतो’  

googlenewsNext
ठळक मुद्देआठवे अंबाजोगाई साहित्य संमेलनात कवी संमेलनाने बहार उडवून दिली.

अंबाजोगाई (मंदाताई देशमुख साहित्यनगरी, मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह) : आठवे अंबाजोगाई साहित्य संमेलनात कवी संमेलनाने बहार उडवून दिली. मंत्रमुग्ध करणाऱ्या चिंतनशील  रचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करायला लावले. एका पेक्षा एक सरस रचनांनी श्रोते आनंद अनुभूतीत रमून गेले. या सोबतच समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कवी संमेलनातून प्रबोधनाचा जागर झाला.

कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अखिला गौस तर  कवी संमेलनाचे बहारदार संचालन भागवत मसने यांनी केले. या कवि संमेलनात दिनकर जोशी, प्रा.विष्णू कावळे, बालाजी सुतार, अलीमोद्दीन अलीम, अतहर हुसेन, प्रा. संजय खाडप, अनुपमा मोटेगावकर, गझलकार डॉ.संतोष कुलकर्णी, संमेलनाध्यक्ष गणपत व्यास,  मंजुषा सबनीस (कुलकर्णी),अंजली यादव आदी मान्यवर कवी सहभागी झाले. सुतार आपल्या कवितेत म्हणतात 

‘एक गोळी मस्तक भेदून गेली, 
पुन्हा एक गोळी आली 
मस्तक भेदून गेली,
मग आणखी गोळी आणखी मस्तक,
मग कोणी केलं याचा 
तपास चालु झाला, 
होत राहिला संपला नाही कधीच’

असे सांगून  गेल्या काही वर्षात राज्यात व देशात विज्ञानवादी व प्रवर्तनवादी विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना  संपविले जात असल्याचे दाहक वास्तव बालाजी सुतार यांनी आपल्या रचनेत सादर केले. अनुपमा मोटेगावकर यांनी ‘गृहिणी’ या कवितेतून स्त्रियांची घालमेल, स्त्रीत्व याविषयीचे अनुभव, स्त्रियांचे भावना विश्व व स्त्रीची सिद्ध होण्यासाठीची धडपड या रचनेतून त्यांनी सभागृहासमोर ठेवली. उपस्थितांनी या रचनेला मनातून दाद दिली. 
प्रवर्तनवादी कवी विष्णू कावळे यांनी आपली ‘इथे’ ही रचना सभागृहासमोर ठेवली. प्रा.कावळे आपल्या रचनेत म्हणतात.

‘पुतळयास छळले कोणी
बेभान, बेबंद झुंडी येथे
जाळले जिवंत कोणास 
आश्रु ढाळतो कोण येथे
देव तुपात, देवळे दुधात
रोज पाजळतात येथे 
चटणी भाकरीच्या विवंचना
रोज छळतात कोणास येथे’

 

या वास्तववादी रचनेतून कावळे यांनी समाजातील भुकेले कंगाल लोकांना भाकरी मिळत नसल्याचे सांगून देव तुपात तर देवळे दूधात पाळजले जातात, मंदिर, मशिदींच्या नावाने लोकांना झुलविले जाते. प्रसंगी लढविले जाते, आपसात रक्तपात घडवून आणला जातो व त्यावर पोळी भाजून भ्रष्ट सत्ताधीश सत्ता काबीज करतात, असा विचार प्रा. कावळे यांनी आपल्या रचनेतून सभागृहासमोर ठेवला तेव्हा रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली. 
यावेळी अतहर हुसेन यांनी सामान्य माणसाची आवाज बुलंद करणारी रचना सादर केली. सामान्य माणसाला व्यवस्थेकडून काय अपेक्षा आहे. दोषींना सजा झाली पाहिजे व प्रामाणिक माणूस निर्दोष राहिला पाहिजे. एकूणच न्याय मिळाला पाहिजे. अशी भावना आतहर हुसेन यांनी आपल्या रचनेतून मांडली. प्रा.संजय खाडप यांनी 'कशाला जगतील माणसं' या रचनेतून माणसांच्या विवंचना त्यांचे प्रश्न व जगण्यासाठीची धडपड उभी केली. प्रा.खाडप म्हणतात. 

‘जगणे झाले अवघड,
आता मरणे झाले सोपे
हिरव्या फांदी वरती काढली, 
बांधली वाळवंटात खोपे
नितीमत्तेची झाली लक्तरे, 
जुन्या संस्कारावरती,
वाटे वरची गेली करपुन सारी रोपे’

 

भागवत मसने यांनी आपल्या बहारदार संचालनाने बहार उडवून दिली. मसने कवितेत म्हणतात.
‘दिल्या घेतल्या चिठ्ठ्यांची 
मी रद्दी केली आहे,
त्यावर एक चड्डी घेतली आहे,
सये मी प्रियकर कसा असावा’

 

या विषयीचे भाष्य करून सभागृहाला मनमुराद हसवून मसने यांनी वातावरण हलकेफुलके केले. प्रसिद्ध गझलकार डॉ.संतोष कुलकर्णी यांनी आपली गझल सादर केली. तर संमेलनाध्यक्ष गणपत व्यास यांनी 
‘मी असेन किंवा नसेन 
पण काळ चांगला येवो 
माणुसकीचा झरा लागता 
अखंड वाहत राहो
जलधारांनी इथली माती 
गंधित होऊन राहो’
‘तहानलेली भूक इथली अन्नाविण जावो’

या सारखी रचना सादर केली. मंजुषा सबनीस (कुलकर्णी) यांनी ‘तोच सूर्य तोच उदय, तोच निसर्ग तोच विलय’ या ओळींची ‘प्रसव पहाट’ ही कविता सादर केली. अलिमोद्दीन अलीम यांनी रचना सादर केली. अंजली यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन महिमा सांगणारी रचना सादर करून दाद मिळविली. कविसंमेलनाचे संयोजक प्रा. रमेश सोनवळकर यांनी आभार मानले. प्रा.सागर कुलकर्णी यांनी यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. कवींचे स्वागत संतोष मोहिते व मेघना मोहिते यांनी केले.

कवी संमेलनाची सुरूवात कवी दिनकर जोशी यांच्या रचनेने झाली. जोशी आपल्या कवितेत म्हणतात  फितुर वाटा मोडूनी, मी असा चालतो स्वप्नांचे फास नवे मी गळा घालतो पाळले अंधार त्यांनी सोडले सुर्यावरी, राखण्या सुर्य सारे मी मला जाळतो. चालतो...चालतो.. या रचनेतून जगण्याची आस आसणारे लोक स्वप्नांचे नवे फास गळ्याभोवती बांधतात. वाटा फितूर झाल्या तरी चालणे सोडलेले नाही. सूर्याचा लख्ख प्रकाश राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रकाशगीत दिनकर जोशी यांनी सादर केले. या प्रसंगी बालाजी सुतार यांनी आपल्या रचनेत सभोवतालचे अस्वस्थ मांडले. समाजातील परिवर्तनवादी विचार संपविण्याचे काम सुरू असल्याचे सांगून एका नंतर एक प्रवर्तनवादी विचार गोळ्यांना बळी पडत आहेत. हे सांगून त्यांनी व्यवस्थेतील मर्मावर भाष्य केले. 

Web Title: 'I am doing such a violation of frustrated divination, I get caught in the trap of dreams'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.