गहिनीनाथगड ते नाशिक थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:40 AM2018-02-26T00:40:08+5:302018-02-26T00:41:13+5:30

पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शेकडे यांच्याकडून १० लाख रुपये आरामात घेतले. हे पैसे सहज मिळाल्याने आणखी ५० लाख रुपयांची मागणी केली. हीच लालूच ब्लॅकमेलरच्या अंगलट आली अन् ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

Gahinathgarh to Nashik Tharar | गहिनीनाथगड ते नाशिक थरार

गहिनीनाथगड ते नाशिक थरार

googlenewsNext
ठळक मुद्देमहंतांकडून ५० लाख रुपये स्वीकारताना टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या जाळ्यात

सोमनाथ खताळ । लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शेकडे यांच्याकडून १० लाख रुपये आरामात घेतले. हे पैसे सहज मिळाल्याने आणखी ५० लाख रुपयांची मागणी केली. हीच लालूच ब्लॅकमेलरच्या अंगलट आली अन् ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. गहिनीनाथगड ते नाशिक हा थरार अंगावर शहारे आणणारा आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलिसांनी महाराजांच्या मदतीने ब्लॅकमेलरचा नाशिकमध्ये पर्दाफाश केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा व अंमळनेर पोलिसांनी करुन तिघे ताब्यात घेतले.

मंगळवारी दुपारी पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथे विठ्ठल महाराज शेकडे यांचे काल्याचे कीर्तन होते. कीर्तन सुरु असतानाच एका व्यक्तीचा फोन आला. महाराजांसोबत असलेल्या एकाने फोन उचलून महाराज कीर्तनात असल्याचे सांगितले. याचवेळी समोरच्याने ‘अति महत्त्वाचा फोन आहे’ असे निरोप देण्यास सांगितले. महाराजांनी याकडे दुर्लक्ष केले. दुपारी दोनच्या सुमारास महाराज जेवायला बसताच पुन्हा फोन आला. शिरुरहून गीते बोलतोय, मला भेटा. तुमच्या अश्लील क्लिप माझ्याजवळ आहेत. समोरुन हे शब्द ऐकताच महाराजांनी फोन कट करुन पुन्हा दुर्लक्ष केले. समोरचा इसम चिडला आणि पुन्हा महाराजांना काही वेळानंतर फोन केला. महाराज, आपण मग्रूर बोलत आहात, असे म्हणत धमक्या दिल्या. संस्थानची बदनामी होईल, गांभीर्याने घ्या अशी कारणे सांगून महाराजांना भावनिक केले. काय असेल ते भेटून मिटवू, असे सांगितले. महाराज घाबरले. त्या दिवशी पुन्हा फोन आला नाही.

बुधवारी पाटोदा तालुक्यातीलच डोंगरकिन्ही येथे कीर्तन सेवेसाठी जाताना रस्त्यातच पुन्हा फोन आला. सहा वाजता घोडनदीला या, असा निरोप दिला. महाराजांनी कीर्तन आटोपून विष्णू वनवे, नागू व हरीलाल यांच्यासोबत साडेपाच वाजताच घोडनदी येथे पोहचले. पाळत ठेवून असलेल्या ब्लॅकमेलरने आपण लवकरच आलात असे म्हणत दरडावले. याचवेळी लाल रंगाच्या कपड्यात एक तरूण दुचाकीवरुन भरधाव वेगाने निघून गेला.

दोन ते तीन वेळा त्याने चकरा मारुन महाराजांसोबत कोण आहे याचा आढावा घेतला. सहा वाजता पुन्हा फोन आला आणि गाडीत असलेल्या इतरांना उतरवण्यास सांगितले. बेला रोडने आतमध्ये येण्यास सांगितले. दोन किमी अंतरावर एक कॉलेज आहे. तेथील नदीकिनारी नेले. आमचे येथे मराठी चॅनलचे आॅफिस आहे. आतमध्ये तुमच्या विरुद्ध तक्रार असलेल्या १० ते १५ महिला आहेत, असे म्हणत त्यांना धमकावले. त्यांच्या गाडीतील पाच लाख रुपये घेऊन ते तेथून पसार झाले.
२३ फेब्रुवारी रोजी पुन्हा फोन आला. पुणे - नगर रस्त्यावरील सुपा नाक्यावर सायंकाळी ७.२२ वाजता त्यांच्याकडून पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी केली. गडाची विनाकारण बदनामी नको म्हणून आपण त्यांना आणखी पाच लाख रुपये दिल्याचे विठ्ठल महाराजांनी सांगितले. यानंतर तरी हे ब्लॅकमेलर शांत होतील, असे महाराजांना वाटले.

परंतु ते पुन्हा भडकले आणि त्यांनी गडावर गुरांची निगा राखण्यासाठी असलेल्या १३ महिलांची तुमच्याविरुद्ध तक्रार असल्याचे फोनवर सांगितले. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये द्यावयाचे आहेत, आम्हाला ५० लाख रुपये द्या, अशी मागणी केली.

हे प्रकरण गंभीर बनत असल्याचे दिसताच विठ्ठल महाराजांनी हा सर्व प्रकार आ. भीमराव धोंडे यांना सांगितला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अंमळनेर ठाण्यात रितसर अर्ज दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे यांनी गडावर जात महंतांकडून सर्व घटनाक्रम जाणून घेतला. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या कानी ही गंभीर घटना घातली. त्याप्रमाणे सापळा लावण्याचे ठरले.

२४ फेब्रुवारीला दुपारी नाशिक येथे एका लग्नासाठी विठ्ठल महाराज जाणार असल्याची माहिती ब्लॅकमेलरला होती. त्यांनी नाशिकमध्येच ५० लाख रुपये स्वीकारण्याचे निश्चित केले. ही माहिती पोलिसांना दिली. त्याप्रमाणे श्रीधर, कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. पाळवदे यांनी अंमळनेर व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी महाराजांसोबत संरक्षणासाठी ठेवले. विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी व कर्मचारी वारकºयांच्या वेशभूषेत होते. गडावरुन नगरपर्यंत पोहचेपर्यंत महाराजांच्या पाठीमागे, पुढे एकही वाहन नव्हते. नगरपुढे निघताच महाराजांच्या गाडीचा दोन वाहनांनी पाठलाग सुरु केला. हा सर्व प्रकार लक्षात आला होता.
इकडे पोलीस अधीक्षक कार्यालयातून ब्लॅकमेलर व महाराजांचे लोकेशन घेतले जात होते. तशी माहिती महाराजांसोबत असलेल्या अधिका-यांना दिली जात होती. नाशिकजवळ जाताच ब्लॅकमेलरचा फोन आला. महाराजांनी आपण नाशिकमधील नाक्यावर असल्याचे सांगितले.

इकडे पोलिसांनी ब्लॅकमेलरचे लोकेशन काढले असता तो पुणे जिल्ह्यातील शिंगोरीत असल्याचे समजले. लग्न सोहळा संपेपर्यंत ब्लॅकमेलर नाशिकमध्ये पोहचले. महाराजांना बाहेर येण्यास सांगितले. आजूबाजूला कोणी आहे का ? याची खात्री पटल्यानंतर ब्लॅकमेलरने महाराजांच्याच गाडीत पैसे घेण्याचे ठरवले. महाराज गाडीत बसताच अमोल औटे नामक व्यक्ती गाडीत घुसला. पैशाची बॅग स्वीकारताच बाजूला वारकरीच्या वेशातील पोलीस उपनिरीक्षक अरविंद गटकूळ व कर्मचारी गणेश हंगे यांनी दोन्ही दरवाजे बंद करुन त्याला गाडीतच पकडले. काही समजण्याच्या आतच त्याचे हात बांधून ताब्यात घेतले. बाजूलाच असलेल्या मोरे नामक वाहन चालकाला दुसºया पथकाने ताब्यात घेतले. इतरांनी मात्र पळ काढला. ब्लॅकमेलरचा पर्दाफाश होताच महाराजांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अमोल व मोरेला अंमळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

रविवारी सकाळीच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, प्रशिक्षणार्थी उप अधीक्षक अनुराधा गुरव, पो.नि. घनश्याम पाळवदे यांनी अंमळनेरला धाव घेत ताब्यात घेतलेल्या अमोल औटेची कसून चौकशी केली. दिवसभर कलुबर्मे, पाळवदे ठाण्यात तळ ठोकून होते. तसेच सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे या प्रकरणाबद्दल माहिती घेत होत्या.

सायंकाळच्या सुमारास क्लिपमध्ये बोलणाºया बुधवंत नामक महिलेसही पाथर्डी तालुक्यातून ताब्यात घेतले. फसवणूक करणारी ही टोळी मोठी असावी असा संशय असून, इतर आरोपीही लवकरच ताब्यात घेऊ असे पाळवदे म्हणाले.

फसवणूक करणारी टोळी सक्रिय
या परिसरात फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे. याच टोळीने काही वर्षांपूर्वी गहिनीनाथ गडाच्या पायथ्याशी असलेल्या महाराजाला ब्लॅकमेल करून ५० हजार रूपये उकळले होते. त्यानंतर एका डॉक्टरकडे महिलेला पाठविले. डॉक्टरांनी आपल्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप त्या महिलेने केला. त्यानंतर याच डॉक्टरला त्यांनी दोन लाख रूपयांचा चुना लावल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस तपासातून आणखी किती लोकांना फसविले, हे समोर येण्याची शक्यता आहे. या भागात ही टोळी सक्रिय असल्याचे सांगण्यात आले.

विठ्ठल महाराज २१ वर्षांपासून महंत
वयाच्या सातव्या वर्षी विठ्ठल महाराज गहिनीनाथ गडावर आले. १४ डिसेंबर १९९७ साली त्यांनी गडाचे महंत म्हणून सूत्रे स्वीकारली. २१ वर्षांपासून ते गडाची सेवा करीत आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारे आपल्यावर संकट ओढवल्याचे त्यांनी सांगितले.

ब्लॅकमेलरला माहिती पोहोचलीच कशी ?
विठ्ठल महाराज कोठे, कधी आणि केव्हा गडावरुन बाहेर पडणार याची खडान्खडा माहिती ब्लॅकमेलरला होती. ही माहिती त्यांना कशी मिळाली, या प्रकरणात गडातील किंवा महाराजांच्या जवळील एखाद्या व्यक्तीचा ब्लॅकमेलरशी संपर्क आहे का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

१० लाख सहज मिळाल्याने वाढला विश्वास
विठ्ठल महाराजांकडून १० लाखांची खंडणी सहज मिळाल्याने ते काही करणार नाहीत असा विश्वास ब्लॅकमेलरला होता. त्यामुळे त्यांनी आणखी ५० लाख रुपयांची मागणी केली. ते पोलिसांना सांगतील असे त्यांना वाटले नाही अन् तेच झाले. बीड पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करुन त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.

म्हणे, आसाराम बापू, राम रहीम करू
आम्हाला ५० लाख रूपये दिले नाहीत, तर तुमच्या क्लिप व्हायरल करून आसाराम बापू आणि बाबा राम रहिम करू, अशी धमकीही या ब्लॅकमेलरने विठ्ठल महाराजांना फोनद्वारे दिली होती. तसे त्यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांबरोबरच यांनीही केले सहकार्य
महाराजांसोबत काही पोलीस अधिकारी व कर्मचारी होते. तसेच बाबूराव केदार, सोमनाथ खेडकर, जालिंदर सानप, रामराव खेडकर, प्रकाश खेडकर यांच्यासह १० ते १५ जण स्वत:च्या वाहनातून महाराजांच्या गाडीचा पाठलाग करीत होते. त्यांचीही कारवाईत मोठी मदत झाली.

Web Title: Gahinathgarh to Nashik Tharar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.