Felicitating the teacher's thumb knocked down the ring for e-learning; Marathwada Sahitya Sammelananera attraction attraction | ई-लर्निंगसाठी अंगठी मोडणार्‍या शिक्षकाचा अंगठ्या देऊन सत्कार; मराठवाडा साहित्य संमेलनाचे ठरले आकर्षण 

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, तेही जिल्हा परिषदेतील शाळेत ई-लर्निंगची सुविधा मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्‍या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या संमेलनाचे आकर्षण ठरले.

वडवणी तालुक्यातील देठेवाडी ही दोन शिक्षकांची शाळा. रवींद्र गायकवाड हे शाळेचे मुख्याध्यापक ध्येयवेडे शिक्षक आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांची ही शाळा. या शाळेतील विद्यार्थ्यांना गरिबीमुळे व शासनाच्या निधीअभावी ई-लर्निंगचे शिक्षण व टॅब कसे मिळणार? ही समस्या गायकवाड गुरुजींना भेडसावू लागली. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता स्वत:च्या लग्नात सासरवाडीकडून मिळालेली अंगठी मोडली.

या अंगठीतूनही ई-लर्निंगचा खर्च निघेना म्हणून त्यांनी भविष्य निर्वाह निधीची ५० हजारांची रक्कम कर्जरूपी उचलली व या माध्यमातून शाळा ई-लर्निंग केली. प्रत्येक विद्यार्थ्यांना टॅब दिले. इतकेच नाही तर देठेवाडीची शाळा मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर दूर होती. या शाळेला जायला डोंगरदर्‍याचा रस्ता. गायकवाड गुरुजी शाळेत जाता-येता रस्त्यावरील दगड उचलून दूर करण्याचे काम करीत. 

या ध्येयवेड्या शिक्षकाची कहाणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यासमोर आली आणि त्यांनी आजच्या साहित्य संमेलनात रवींद्र गायकवाड यांचा सपत्नीक भरपेहराव आहेर करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. 
एक अंगठी विद्यार्थ्यांसाठी मोडणार्‍या या गुरुजींना यावेळी दोन अंगठ्या भेट देऊन  त्यांचा गौरव करण्यात आला. या विशेष सत्काराने उपस्थित सर्वच पाहुण्यांनी गायकवाड गुरुजींच्या कार्याचा गौरव सातत्याने आपल्या भाषणातून केला.


Web Title: Felicitating the teacher's thumb knocked down the ring for e-learning; Marathwada Sahitya Sammelananera attraction attraction
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.