नकली सोने गहाण; अ‍ॅक्सिस बँकेला १७ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:01 AM2019-04-24T00:01:24+5:302019-04-24T00:02:42+5:30

बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अ‍ॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण १७ लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे.

Fake gold mortgages; Axis Bank gets 17 lakhs | नकली सोने गहाण; अ‍ॅक्सिस बँकेला १७ लाखांचा गंडा

नकली सोने गहाण; अ‍ॅक्सिस बँकेला १७ लाखांचा गंडा

Next
ठळक मुद्देपरळीतील प्रकार : मूल्यमापक सोनारानेच अन्य तिघांच्या साह्याने केली फसवणूक

बीड : बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अ‍ॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण १७ लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या वार्षिक आॅडीटमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिन्ही कर्जदारांसह मूल्यमापक सोनारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परळीतील या घटनेने खळबळ उडाली आहे.
सोने तारण कर्ज देण्यासाठी प्रत्येक बँकेकडून अधिकृतरीत्या सोने मूल्यमापकाची नेमणूक करण्यात येते. ग्राहकाकडून कर्जमागणीचा अर्ज आल्यानंतर मूल्य मापकाकडून सोन्याच्या गुणवत्तेचा व किंमतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कर्ज देण्यात येते. या संपुर्ण प्रक्रियेत सोने मूल्यमापकाची भुमिका अत्यंत महत्वाची असते. परळी येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेकडून सीमा ज्वेलर्सचे व्यंकटेश वैजनाथ डुबे याची अधिकृत मूल्यमापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. परंतु, मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मूल्यमापक डुबे यानेच काही मित्रांसोबत बँकेलाच गंडा घालण्याचा कट रचला आणि नकली कर्जदार बँकेत पाठविले. त्यात सागर राजेंद्र धोकटे (रा. धोकटे गल्ली, परळी) याने १४७ ग्रॅम सोने तारण ठेऊन २ लाख ९९ हजारांचे कर्ज उचलले. रमेश दगडूबा फड याने ४५२ ग्रॅम सोन्याच्या बदल्यात ९ लाख ३४ हजार आणि गोविंद बालासाहेब सोनवणे (दोघेही रा. सुभाष चौक, परळी) याने २२४ ग्रॅम सोने तारण ठेऊन ४ लाख ६३ हजार असे तिघांनी एकूण १६ लाख ९६ हजार रुपयांचे कर्ज उचलले.
या तिन्ही कर्ज प्रकरणात सोन्याचे मूल्यमापन व्यंकटेश डुबे याने केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये बँकेचे वार्षिक आॅडीट सुरु असताना सदरील सोने नकली असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बँकेने अधिक चौकशी केली असता मूल्यमापक डुबे यानेच खोटे कर्जदार हाताशी धरून नकली सोने बँकेत जमा केले. नंतर खोटा अहवाल देत कर्ज रक्कम उचलून बँकेची फसवणूक केली असा घटनाक्रम अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक अरुण आनंद किट्टद यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. त्यावरून मूल्यमापक डुबे आणि तिन्ही कर्जदारांवर परळी शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी मोकाटच
याबाबत परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, असे सांगून त्यांनी भ्रमणध्वनी बंद केला.

Web Title: Fake gold mortgages; Axis Bank gets 17 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.