Drought In Marathwada : पिके हातची गेली, स्थलांतर वाढणार, गाव ओस पडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:56 AM2018-10-18T11:56:08+5:302018-10-18T12:12:26+5:30

दुष्काळवाडा : अस्मानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या धारूर तालुक्यातील सिंगनवाडी गावची ही स्थिती. 

Drought in Marathwada: The crops have vanished, migration will increase, the villages will be empty! | Drought In Marathwada : पिके हातची गेली, स्थलांतर वाढणार, गाव ओस पडणार!

Drought In Marathwada : पिके हातची गेली, स्थलांतर वाढणार, गाव ओस पडणार!

Next

- अनिल महाजन, सिंगनवाडी, ता. धारूर, जि. बीड

अत्यल्प पावसामुळे खरिपाची पिके हातची गेली. आता रबीची आशा पूर्णत: मावळली आहे. हाताला काम मिळण्यासाठी यावर्षी स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे पुढील आठ महिने गाव ओस पडणार आहे. अस्मानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या धारूर तालुक्यातील सिंगनवाडी गावची ही स्थिती. 

चोहोबाजूने डोंगरात वसलेल्या सिंगनवाडीचे क्षेत्रफळ ५२० हेक्टर आहे. यात ४८८ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. शेतकरी कापूस, सोयाबीन, बाजरी, हायब्रीडचे पीक प्रामुख्याने घेतात. फक्त दहा टक्के शेती ओलिताखाली आहे. यावर्षी पाऊस न झाल्याने कापूस, सोयाबीन, बाजरीची पिके हातची गेली आहेत. कशीबशी अवघी ३० टक्के पिके हातात आली. खर्चदेखील निघणार नाही. त्यामुळे शेतकरी हैराण होऊन गेले आहेत. रबीचे क्षेत्र फक्त दहा टक्के आहे. पाऊसच नसल्याने पुढचे दिवस कसे जातील याची चिंता सर्वांना सतावत आहे. त्यामुळे खरिपाचे पीक घ्यायचे आणि ऊस तोडणीसाठी जायचे, असे सूत्र इथल्या अनेक शेतकरी कुटुंबांचे आहे. 

तालुक्यातील ७० टक्के गावांतील शेतकरी दरवर्षी ऊसतोडीसाठी महाराष्ट्र  व कर्नाटकात जातात. यावर्षी तर दुष्काळी स्थिती असल्यामुळे ऊस तोडणीला जाणाऱ्यांचे प्रमाण आणखी वाढणार आहे. त्यामुळे अख्खे गाव ओस पडणार आहे. सिंगनवाडीलगत असलेल्या नदीपात्रात बोअरमधून गावातील सार्वजनिक विहिरीत पाणी आणले जाते. या पाण्यावरच ग्रामस्थांची तहान भागते. यावर्षी त्याचीही शाश्वती राहिली नाही. पावसाअभावी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत आहे. माणसांना पाणी मिळणे दुरापास्त असताना जनावरांना पाणी कोठून आणावे हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे पशुधन मातीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सीताफळाचे उत्पादन कमीच
या दिवसात सीताफळ उत्पादनातून थोडी फार मजुरी उपलब्ध व्हायची. रोज गावात सीताफळ खरेदीसाठी फडी लागायची. दोन-तीन टेम्पो सीताफळाची निर्यात व्हायची; मात्र अपुऱ्या पावसामुळे या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच स्थलांतर करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

पावसाअभावी श्रमदानाचा ‘वॉटर कप’ रिताच
गाव परिसरात नेहमी हिरवाईने नटणारे डोंगर उजाड झाले आहेत. या गावाने पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत श्रमदानातून जलबचतीची कामे केली. यावरच आज हे गाव थोडे फार तरले आहे. मात्र, या काळात केलेली कामे कोरडीठाक आहेत. पाऊस नसल्याने श्रम करूनही निसर्गाने साथ न दिल्याने गावाला पाणीदार होण्यासाठी पुढील पावसाळ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

६२९ - तालुक्याची पावसाही वार्षिक सरासरी 
६७६ - मिमी २०१७ ला झाला पाऊस 
२६६ - मिमी यावर्षी झालेला पाऊस 
५२० - हेक्टर सिंगनवाडीचे क्षेत्र 
४८८ - हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र 

६० - टक्के तूट उत्पन्नात 
धारूर तालुक्यात अत्यंत कमी पावसामुळे गंभीर परिस्थिती असून, प्रमुख पीक कापूस व सोयाबीनच्या उत्पादनात ६० ते ६५ टक्के तूट आली आहे. खरिपाचे पीक धोक्यात आल्याने रबी पेरणीचे प्रमाण घटणार आहे. 
- बी. एम. पाटील, तालुका कृषी अधिकारी, धारूर 

बळीराजा काय म्हणतो?
यावर्षी पाऊस नसल्याचे सोयाबीनची वाढ झाली नाही. उत्पन्नात सत्तर टक्के घट होणार असून, केलेला खर्च निघणे अवघड झाले. सध्या शेतात उभे सोयाबीन पूर्णपणे वाळून गेले आहे. पुढे काय करावे हे सांगणे अवघड झाले आहे. - नंदकुमार भोसले, सरपंच 

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकांना पूर्णपणे फटका बसला आहे. उसावर थोडीफार मदार होती, तर हुमणीमुळे जागेवरच ऊस जळाला आहे. शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडला आहे. - लिंबराज भोसले 

दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत आम्ही दिवस-रात्र काम केले. श्रमदानातून केलेले सीसीटीडीप सीसीटी ठणठणीत कोरडे आहेत. उत्पन्न तर सर्वच घटले आहे, पोटाची खळगी भरण्यासाठी गावालाच स्थलांतर करावे लागणार आहे. - संतोष भोसले 

Web Title: Drought in Marathwada: The crops have vanished, migration will increase, the villages will be empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.