वाहने अडवून लुटणाऱ्या टोळीचा अंबाजोगाईत पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:22 PM2018-05-26T23:22:16+5:302018-05-26T23:22:16+5:30

Busted gang of vehicles detonated | वाहने अडवून लुटणाऱ्या टोळीचा अंबाजोगाईत पर्दाफाश

वाहने अडवून लुटणाऱ्या टोळीचा अंबाजोगाईत पर्दाफाश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : रस्त्यात वाहने अडवून लुटमार करण्याच्या घटना केज, युसूफ वडगाव, सिरसाळा, अंबाजोगाई हद्दीत मागील काही महिन्यात घडल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या विशेष पथकाला या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. दोन लुटारूंना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या टोळीत आणखी किती लोक आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

२६ मार्च रोजी केज येथील ट्रॅव्हल्स एजंट शेख अमजद शेख अहमद हे धारूरहून केजकडे जात असताना तांबवा पाटीजवळ त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावून अनोळखी चौघांनी त्यांच्याच गाडीतून अपहरण केले आणि आधी पाच लाख आणि नंतर तडजोडीत एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे शेख मजद यांचा जीव वाचला होता. मात्र अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.

त्यानंतर ३ एप्रिल रोजी अतुल सुंदरराव देशमुख यांना केजहून बोरी सावरगावकडे जाताना तिघांनी रस्त्यात धक्का देऊन पाडले होते आणि रोख ६ हजार, मोबाईल आणि गाडी घेऊन पसार झाले होते. ६ एप्रिल रोजी नवनाथ त्रिभुवन हे कावळ्याची वाडी फाटा येथे थांबले असताना तिघांनी त्यांना सिरसाळा येथे सोडण्याच्या बहाण्याने रेवली शिवारात नेऊन चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दोन मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेतले. नंतर त्यांनी एटीएम मधून ९,५०० रुपये काढून घेतले. तसेच सिरसाळा येथे अशाच पद्धतीने लुटमारीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला होता तर तर अंबाजोगाई येथून दुचाकी चोरीची घटना घडली होती. सततच्या लुटमारीच्या घटनांची अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी गांभीर्याने दखल घेतली आणि गुन्ह्यांच्या शोधासाठी एक विशेष पथक नेमले.

या पथकाने सापळा रचून अमोल अशोक मुंडे (रा. कोयाळ, ता. धारूर) यास अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून तर लक्ष्मण बालाजी कराड (रा. चोपनवाडी) यास अंबाजोगाई शहरातून ताब्यात घेतले. या दोघांनी अन्य इतर साथीदारांसोबत मिळून सदरील गुन्हे केल्याची कबुली दिली असून तपासात त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी, मोबाईल आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकातील पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, सानप, नागरगोजे आणि पवार यांनी केली.

Web Title: Busted gang of vehicles detonated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.