बीड जिल्हा परिषदेत भाजप आघाडीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:18 PM2017-10-17T23:18:35+5:302017-10-17T23:19:27+5:30

बीड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आघाडीला जबरदस्त धक्का बसला असून, सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरले आहेत. यामुळे पुन्हा एकदा बीड जि.प.च्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

BJP leads in Beed Zilla Parishad | बीड जिल्हा परिषदेत भाजप आघाडीला धक्का

बीड जिल्हा परिषदेत भाजप आघाडीला धक्का

googlenewsNext
ठळक मुद्दे राष्ट्रवादीचे ६ बंडखोर सदस्य अपात्र

बीड : बीड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आघाडीला जबरदस्त धक्का बसला असून, सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरले आहेत. यामुळे पुन्हा एकदा बीड जि.प.च्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या सहा सदस्यांत माजी मंत्री सुरेश धस यांच्या गटाचे ५, तर आ. जयदत्त क्षीरसागर गटाच्या एका सदस्याचा समावेश आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.


अपात्र ठरलेल्या या सहा सदस्यांमध्ये शिवाजी एकनाथ पवार, (रा. झापेवाडी, ता. शिरूर), प्रकाश विठ्ठल कवठेकर (रा. उखंडा, ता. पाटोदा), अश्विनी ज्ञानेश्वर जरांगे (रा. कुसळंब, ता. पाटोदा), संगीता रामहरी महारनोर (रा. दादेगाव, ता. आष्टी), मंगल गणपत डोईफोडे (रा. ईट पिंपळनेर, ता. बीड), अश्विनी अमर निंबाळकर (रा. आष्टा हरिनारायण, ता. आष्टी) यांचा समावेश आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६० पैकी सर्वाधिक २५ जागा राष्ट्रवादीने, तर त्याखालोखाल १९ जागा भाजपने जिंकल्या होत्या. शिवसेना आणि शिवसंग्रामने प्रत्येकी ४, काकू-नाना आघाडी-३ अपक्ष २ तर काँग्रेसने ३ जागा जिंकल्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती.


अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीत राजकीय घडामोडी वेगाने होत राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्या गटाचे ५ आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा १ अशा सहा जणांनी बंडखोरी करीत भाजपला साथ दिली. यापैकी धस गटाच्या पाच जणांनी भाजप आघाडीला मतदान केले, तर क्षीरसागर गटाच्या मंगल डोईफोडे या आजारी असल्याचे कारण दाखवीत सभागृहात अनुपस्थित राहिल्या. शिवसेना आणि शिवसंग्रामचे प्रत्येकी ४, काँग्रेस १, राष्ट्रवादीचे बंडखोरीचे ५ यांना साथीला घेत भाजपने ३४ विरुद्ध २५ अशा फरकाने सत्ता काबीज केली होती. जि.प. अध्यक्षपदासाठी भाजपच्या सविता विजय गोल्हार यांनी मंगला प्रकाश सोळंके यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसंग्रामच्या जयश्री राजेंद्र मस्के यांनी शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांचा पराभव केला होता.


या निकालाविरुद्ध पक्षांतर विरोधी कायद्याचा भंग केला म्हणून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे, पराभूत उमेदवार मंगला सोळंके आणि अजय मुंडे यांनी या सहा जणांविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करीत या सर्वांना अपात्र घोषित करावे, अशी याचिका दाखल केली होती. अखेर सुनावणीनंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी १६ आॅक्टोबर रोजी ही याचिका निकाली काढीत या सर्वांना अपात्र ठरविले आहे.

 

 

 

Web Title: BJP leads in Beed Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.