बीडमध्ये कमळाने विस्कटली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 04:25 PM2019-05-25T16:25:13+5:302019-05-25T16:30:02+5:30

विरोधकांच्या जातीय राजकारणाला प्रीतम मुंडे यांचा ‘हाबाडा’

BJP destroys Nationalist Congress Party's campaign | बीडमध्ये कमळाने विस्कटली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घडी’

बीडमध्ये कमळाने विस्कटली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घडी’

Next
ठळक मुद्दे१९९६ पासून पोटनिवडणुकीसह सातव्यांदा भाजपची बाजी  धनंजय मुंडेंनाही जोरदार धक्का

- सतीश जोशी

वडिलांच्या पावलावर मजबूत पाऊल ठेवून डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात सातव्यांदा भाजपाचे कमळ फुलविताना राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घडी’ विस्कटून टाकली. २००४ चा अपवाद वगळता १९९६ पासून पोटनिवडणुकीसह सातव्यांदा भाजपने बीडची जागा सहज जिंकली आहे. २००९ आणि १४ मध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी तर २०१४ च्या पोटनिवडणुकीसह डॉ. प्रीतम यांनी विक्रमी मताधिक्याने २०१९ ची निवडणूक जिंकून विरोधकांच्या जातीय राजकारणाला चांगलाच ‘हाबाडा’ दिला. 

या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांनी ५०.१५ टक्के मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा जवळपास १ लाख ६८ हजार ३६६ मतांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रचारात जातीयवाद पाहावयास मिळाला. परंतु मतदारांनी मात्र सर्व जातीय समीकरणे मोडीत काढली. भाजपाच्या विजयात जिल्ह्यातील विकास कामासोबतच मोदी फॅक्टरच महत्त्वाचा ठरला. २०१४ च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे ह्या विक्रमी ७ लाख मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या. २००९ आणि १४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे हे जवळपास १ लाख ४० हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. पोटनिवडणुकीसह ही निवडणूक जिंकून  प्रीतम यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले. 

लागोपाठ चौथ्यांदा मुंडे घराण्याने ही लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. १९५२ पासून ते २०१९ पर्यंत बीड लोकसभा मतदारसंघासाठी १८ निवडणुका झाल्या. यापैकी ७ वेळा काँग्रेस, २ वेळा कम्युनिस्ट पक्ष, १ वेळा राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल आणि ७ वेळा भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक जिंकली आहे. १९९६ पासून झालेल्या ८ पैकी ७ निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघात २८ हजार, परळी १८,९१९, बीड ६,२६२, आष्टी ७० हजार ४४, गेवराई ३४ हजार ४८८, तर माजलगावमध्ये प्रीतम मुंडे यांना १९ हजार ७१६ मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत २६ अपक्ष रिंगणात उतरले होते. संपत चव्हाण यांनी १६ हजार ७७० मते घेतली. इतर अपक्षांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. या मतदारसंघात ‘नोटा’ ची मते २४८७ इतकी होती. 

भाजपत सुसंवाद, राष्ट्रवादीचे एकला चला रे
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सोडून इतर ३४ उमेदवारांना पडलेल्या एकूण मतांची संख्या १ लाख ६१ हजार ९१७ इतकी आहे. भाजपच्या प्रचारात नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांत सुसंवाद होता. याउलट राष्ट्रवादीची यंत्रणा ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसली. अंतर्गत गटबाजीनेही राष्ट्रवादीच्या पराभवास हातभार लावला. पंकजा आणि प्रीतम भगिनींनी  पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचे राजकारण चालू दिले नाही.

स्कोअर बोर्ड
प्रीतम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार १७५, तर बजरंग सोनवणे यांना ५ लाख ८ हजार ८०९ (३७.७ टक्के) मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे ९२ हजार १३९  (६.८१ टक्के) मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोनवणे आणि जाधव, अपक्ष संपत चव्हाण (१६७७१), मुजीब इनामदार (६१४१) हे चौघे वगळता इतरांना चार हजाराच्या पुढे मते घेता आली नाहीत. 

Web Title: BJP destroys Nationalist Congress Party's campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.