बीड जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा जीवघेणा शाळा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:47 PM2017-11-24T23:47:17+5:302017-11-24T23:47:22+5:30

पल्या पाल्याला शाळेत लवकर पोहोचता यावे यासाठी पालकांनी रिक्षा लावली. त्यांना पैसेही दिले; परंतु वास्तविक पाहता या रिक्षाची क्षमता किती अन् त्यात प्रत्यक्षात किती विद्यार्थी बसविले जातात, याबाबत पालक अनभिज्ञ असतात. जादा पैसे कमावण्याच्या उद्देशातून रिक्षातून विद्यार्थ्यांची सर्रास अवैध प्रवासी वाहतूक होते. याच अवैध वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत आहे.

Beginning school stay in Beed district | बीड जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा जीवघेणा शाळा प्रवास

बीड जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा जीवघेणा शाळा प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस, आरटीओ, शाळा, पालक अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आपल्या पाल्याला शाळेत लवकर पोहोचता यावे यासाठी पालकांनी रिक्षा लावली. त्यांना पैसेही दिले; परंतु वास्तविक पाहता या रिक्षाची क्षमता किती अन् त्यात प्रत्यक्षात किती विद्यार्थी बसविले जातात, याबाबत पालक अनभिज्ञ असतात. जादा पैसे कमावण्याच्या उद्देशातून रिक्षातून विद्यार्थ्यांची सर्रास अवैध प्रवासी वाहतूक होते. याच अवैध वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत आहे.

परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रूपाली साळवे (१३) या विद्यार्थिनीचा रिक्षातून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतरही प्रशासन अन् पालक डोळ्यावर कातडे ओढून झोपले असल्याचे दिसते. याकडे आरटीओ, पोलीस प्रशासन व शाळांनीही डोळेझाक केल्याने आजही विद्यार्थ्यांचा सर्रास जीवघेणा प्रवास सुरूच आहे. अशा आणखी किती घटना घडल्यावर प्रशासन दखल घेणार, असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.

सिरसाळा येथील न्यू हायस्कूलच्या इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारी रुपाली साळवे ही विद्यार्थिनी रिक्षातून शाळेत जात होती. या रिक्षात तब्बल १०-१२ विद्यार्थी असल्याचे प्रथमदर्शी लोकांनी सांगितले होते. रिक्षात जास्त विद्यार्थी असल्याने रिक्षा खड्ड्यात आढळल्याने ती खाली कोसळली. तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरटीओ, पोलीस प्रशासन, पालक व शाळा या दुर्घटनेपासून काही तरी ‘धडा’ घेतील असे वाटले होते; परंतु सर्वच जण अनभिज्ञच राहिले. आजही रिक्षातून १० ते २५ विद्यार्थी अक्षरश: कोंबून वाहतूक होत असते. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या रिक्षाचालकांवर कारवाई करून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुसह्य व्हावा, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

आरटीओचे पाठबळ
शहरासह जिल्ह्यात नियमबाह्य रिक्षांची तपासणी करून कारवाई करण्याचे काम आरटीओ कार्यालयाचे आहे. परंतु येथील ‘निकम्म्या’ अधिकाºयांमुळे तपासणी व कारवाया होत नाहीत. त्यांच्या दुर्लक्षामुळेच वाहनांचे अपघात होऊन जीव गमवावे लागत आहेत. या अपघातांना आरटीओ कार्यालय व संबंधित वाहन निरीक्षक जबाबदार आहेत, असा आरोप होत आहे. वाहन निरीक्षकांची चौकशी करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका
गेवराई शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मराठी व इंग्रजी शाळेचे पेव फुटले असून, या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याकरिता शाळेच्या व खाजगी बस तसेच अ‍ॅपे रिक्षांचा वापर केला जातो. मात्र, यातील वाहनांत भरमसाट विद्यार्थी कोंबले जात असून अपघातास निमंत्रण मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

गेवराई शहर व ग्रामीण भागात खाजगी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या ३० च्या जवळपास शाळा आहेत. आपल्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील याकडे संस्था चालकाचा विचार असतो. या शाळेत ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यांना शाळेत ने-आण करण्यासाठी काही शाळेच्या बस तर काही शाळेत खाजगी अ‍ॅपेरिक्षा मोठ्या प्रमाणात आहेत. या गाड्यात क्षमतेपेक्षा जात विद्यार्थी बसवून हे रिक्षावाले वाहतूक करीत असल्याचे दिसून येते.

अंबाजोगाईत गैरप्रकारांना निमंत्रण
अंबाजोगाई  तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांची शाळा व महाविद्यालयासाठी होणारी वाहतूक रिक्षातूनच सुरू आहे. दिवसेंदिवस विद्यार्थिनींमध्ये असुरक्षितता वाढू लागली आहे. एकाच रिक्षात २० ते २५ विद्यार्थिनींना कोंबून सर्रास अवैध वाहतूक केली जाते. या प्रकारामुळे मुलींची छेडछाड व गैरप्रकार मोठ्या प्रमाणात वाढू लागले असून रिक्षाच स्कूल बसची भूमिका निभावू लागल्याने विद्यार्थी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. अंबाजोगाई तालुक्यात अवैध वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सुविधा अपुरी असल्याने तर अनेक ठिकाणी बस, महाविद्यालय व शाळांचे वेळापत्रक सुसंगत नसल्याने रिक्षातून प्रवास करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. याचा गैरफायदा रिक्षाचालक उचलत आहेत. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुलभा सोळंके यांनी केली आहे. पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्तरीत्या कारवाई करून ही दुरवस्था दूर करावी, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख सुनील जगताप यांनी केली आहे.
शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ गित्ते म्हणाले, ठोस उपाययोजना आखण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करु.

एका रिक्षात १६ विद्यार्थी
परळी शहरातील शाळांमध्ये पसिरातील खेडेगावातील व शहरातील विद्यार्थी रिक्षातूनच येतात. त्यासाठी रिक्षा लावण्यात आलेल्या आहेत. वास्वविक पहाता हे रिक्षा चालक एका रिक्षामध्ये तब्बल १६ विद्यार्थी बसवून वाहतूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याकडे मात्र कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. परळी तालुक्यात जिल्हा परीषद, इंग्रजी अशा ३२३ शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळांना स्कूल बसची व्यवस्था नाही. शहरात १०० शाळा असून पैकी २० शाळा इंग्रजी आहेत. शहरातील काही शाळांनाच स्कूल बसेसची सुविधा आहे. ज्या शाळांत स्कुल बस नाही, त्या शालेय व्यवस्थापन समितीने स्कुल बसची सुविधा करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी न.प.चे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी केली आहे.

Web Title: Beginning school stay in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.