बीड पालिकेत ‘आघाडी’ला धक्का; ‘एमआयएम’ला लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:36 AM2018-01-23T00:36:29+5:302018-01-23T00:37:46+5:30

काकू-नाना आघाडीला धक्का देत वर्षभरापासून विस्कटलेली सत्तेची ‘घडी’ बसविण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. यामध्ये आघाडीला सोडचिठ्ठी देवून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना साथ देणा-या एमआयएमची लॉटरी लागली आहे. बांधकामसह सभापतीची तीन पदे मिळविण्यात त्यांना यश आले आहे. सोमवारी बीड पालिकेत विविध विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्यानंतर पालिकेतील सत्तेचे चित्र स्पष्ट झाले. या निवडीत पुतण्याला काकाच वरचढ राहिले.

Beed pulls NCP into lead; Lottery to 'MIM' | बीड पालिकेत ‘आघाडी’ला धक्का; ‘एमआयएम’ला लॉटरी

बीड पालिकेत ‘आघाडी’ला धक्का; ‘एमआयएम’ला लॉटरी

googlenewsNext
ठळक मुद्देविषय समित्यांची सभापती निवडणूक बिनविरोध; निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींची मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : काकू-नाना आघाडीला धक्का देत वर्षभरापासून विस्कटलेली सत्तेची ‘घडी’ बसविण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. यामध्ये आघाडीला सोडचिठ्ठी देवून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना साथ देणा-या एमआयएमची लॉटरी लागली आहे. बांधकामसह सभापतीची तीन पदे मिळविण्यात त्यांना यश आले आहे. सोमवारी बीड पालिकेत विविध विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्यानंतर पालिकेतील सत्तेचे चित्र स्पष्ट झाले. या निवडीत पुतण्याला काकाच वरचढ राहिले.

बीड नगर पालिकेच्या सभागृहात सोमवारी सकाळी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली. दुपारी १२ वाजता पीठासीन अधिकारी विकास माने, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरसह नगरसेवक दाखल झाले. निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिठासिन अधिकारी माने यांनी नवनिर्वाचित सभापतींची नावे जाहीर केली. निवडीनंतर सर्व सभापतींनी हात उंचावून आभार व्यक्त केले. यावेळी सभागृहात उपस्थित नगरसेवक व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पालिकेच्या प्रांगणात ढोल-ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव केला. तसेच फटाक्यांची आतिषबाजीही झाली.

दरम्यान, काका-पुतण्या असा वाद वर्षभरापासून बीड पालिकेत सुरू होता. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले होते. विकास कामांसह रखडलेल्या कामांवर दोन्ही गट एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत होते. याचा फायदा इतर विरोधक पक्षांनीही घेतला. काका-पुतण्याच्या वादात बीड शहराचा विकास रखडल्याच्या भावना विरोधकांनी व्यक्त केल्या होत्या. तसेच नागरिकही या वादाला वैतागले होते.

नगराध्यक्षपद राष्ट्रवादीचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे गेल्यानंतर पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी एमआयएम स्वतंत्र गटाला सोबत घेऊन संख्याबळाची जोडणी केली. त्यामुळे उपनगराध्यक्षसह विषय समित्यांचे सभापती आघाडीचे झाले. परंतु एमआयएम गटाने विकास कामांमध्ये ‘आघाडी’ मिळत नसल्याचा आरोप करीत संदीप क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी देत नगराध्यक्षांना पाठिंबा दिला होता. यातच आघाडीचे दोन सदस्य अपात्र ठरल्याने त्यांचे संख्याबळ आणखीच कमी झाले. याचा फायदा नगराध्यक्षांना झाला.

आघाडीला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीला सहकार्य करणाºया एमआयएमला तीन सभापती पदे देऊन व इतर समित्यांवर आपल्या गटाचे सभापती निवडत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पालिकेवर वरचष्मा राखला. सर्व नवनिर्वाचित सभापती, सदस्यांचा नगराध्यक्षांनी सत्कार केला. यावेळी नगरसेवक उपस्थित होते.


चुलत भावाचा उपनगराध्यक्षांना टोला
सभापती निवडीनंतर नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर पत्रकारांना माहिती देत होते. शिक्षण, सांस्कृती व क्रीडा हे पद उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
एवढ्यात नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी नगराध्यक्षांना थांबवत बोलण्यास सुरूवात केली.
उपनगराध्यक्षांच्या मोठ्या बंधुंना जिल्हा परिषदेत शिक्षणाचा दांडगा अनुभव आहे. त्यांचा अनुभव पाहूनच हे पद उपनगराध्यक्षांना दिले आहे. जि.प.त जसे कामे केले, तसेच आता इकडेही करून दाखवा, असे म्हणत उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना टोला लगावला.
यांची लागली सभापतीपदी वर्णी
बांधकाम - शेख साजेद (एमआयएम), विद्युत -शेख समी (एमआयएम), नियोजन - शेख सुलताना शेख चाँद (एमआयएम), पाणी पुरवठा - शेख मुखीद लाला (राष्ट्रवादी), स्वच्छता - अ‍ॅड.विकास जोगदंड (राष्ट्रवादी), महिला व बालविकास - जयश्री विधाते (सभापती), सविता राजेंद्र काळे (उपसभापती, राष्ट्रवादी), स्थायी समिती - विनोद मुळूक (राष्ट्रवादी), जगदीश गुरखुदे (भाजप), शिक्षण - उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर (काकू-नाना आघाडी)
गटनेतेपदी अमर नाईकवाडे
काकू - नाना आघाडीचे गटनेते फारुक पटेल यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडील गटनेतेपद आता तत्कालिन बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांच्याकडे सोपविले आहे.


शहर विकासासाठी सदैव तत्पर
शहर विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असू. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवू. यापूर्वी इच्छा असूनही कामे करता आली नाहीत, परंतु आता ही सर्व कसर भरून काढत शहरात सर्वत्र विकास करण्याबरोबरच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.
- डॉ.भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्ष

Web Title: Beed pulls NCP into lead; Lottery to 'MIM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.