Beed district hospital assaulted hostess by accusing them not being treated properly | बीड जिल्हा रुग्णालयात उपचार योग्य होत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून परिचारिकेला मारहाण
बीड जिल्हा रुग्णालयात उपचार योग्य होत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून परिचारिकेला मारहाण

बीड : माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत अधि-परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. सोडविण्यासाठी गेलेल्या परिसेविकेलाही मारहाण झाली. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ८ मध्ये घडली. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ८ मध्ये अनिता रावण कांबळे यांची बुधवारी रात्री ड्युटी होती. त्यांच्याच वार्डमध्ये शेख शमीम नावाची महिला रुग्ण तापेच्या आजारामुळे दोन दिवसांपूर्वी दाखल झाली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास शेख यांचा मुलगा रुग्णालयात आला. माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत त्याने कांबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी आदेश न दिल्यामुळे मी सलाईन लावू शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपीने कांबळे यांचा हात पकडला. तात्काळ कांबळे यांनी हा प्रकार परिसेविका संगीता दिंडकर यांना कळविला. त्यांनी कर्मचा-यांसह वार्डमध्ये धाव घेतली. भैय्या क्या हुआ असे विचारताच आरोपीने दिंडकर यांचाही हात पकडून मुरगाळला. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या शारदा गायकवाड यांनाही आरोपीने धक्काबुक्की केली.

हा प्रकार समजल्यानंतर सर्व कर्मचा-यांनी धाव घेताच आरोपीने रुग्णालयातून पलायन केले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना प्रकार सांगण्यात आला. रात्रीच्या सुमारास त्यांनी रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात शेख शमीम यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक तास कामबंद
अधि-परिचारिका व परिसेविकेला धक्काबुक्की झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाºयांनी एक तास कामबंद आंदोलन केले. मात्र, रुग्णांची काळजी घेत हे आंदोलन मागे घेण्यात आले.

कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण
डॉक्टर, परिचारिका आपल्याकडे लक्ष देत नाहीत, सलाईन लावत नाहीत, इंजेक्शन देत नाहीत असा गैरसमज रुग्ण व नातेवाईकांमध्ये असतो. मात्र, गरज नसताना असे उपचार करणे धोक्याचे असू शकते. याच गैरसमजूतीतून वाद उद्भवतात. बुधवारचा प्रकारही असाच काहीसा होता. या घटनेमुळे मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Web Title: Beed district hospital assaulted hostess by accusing them not being treated properly
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.