कुबडीऐवजी आता ताठपणे चालत शाळेत जाणार अशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:49 AM2019-03-14T00:49:50+5:302019-03-14T00:50:25+5:30

कुबड्यांचा आधार घेत गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरील नेकनूरच्या शाळेत जात होता. बीड येथील दिव्यांग शिबिरात आल्यानंतर त्याला कृत्रिम पाय मिळाला.

Ashok will go to school with Jaypur foot | कुबडीऐवजी आता ताठपणे चालत शाळेत जाणार अशोक

कुबडीऐवजी आता ताठपणे चालत शाळेत जाणार अशोक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जन्मत:च पायाची चुंबळ झालेली. एक पाय चांगला, उजव्या पायाचा पंजा गुडघ्याबरोबर मागच्या बाजूला. शरीर तर वाढत होते. तशाच अवस्थेत शाळेत जाणारा अशोक नंतर काठीचा आधार घेऊन चालत होता. नंतर कुबड्यांचा आधार घेत गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरील नेकनूरच्या शाळेत जात होता. बीड येथील दिव्यांग शिबिरात आल्यानंतर त्याला कृत्रिम पाय मिळाला. आता तो कुबड्यांविना चालत शाळेत जाणार आहे. डाव्याच्या बरोबरीचा उजवा कृत्रिम पाय जोडल्यानंतर चालताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
वाघेबाभूळगाव (ता.केज) येथील अशोक बंडू पवार या शाळकरी मुलाची ही कहाणी. लहानपणीच वडील घर सोडून गेले. अशोक व दोन मुलांचा सांभाळ आई सिंधूबाईने केला. प्रसंगी अर्ध्या कोयत्याची मजुरी उचलीत ऊस तोडणीलाही गेल्या. अशोकला शिकण्याची ओढ होती. अपंगत्वामुळे शाळकरी मुले, मित्र मस्करी करीत पण नशिबाच्या थट्टेपुढे तो खचला नाही. पाय बरा करण्याचे आव्हान या कुटुंबापुढे होते. औंध, पुणे व इतर शहरात दाखवले. गुडघ्या खालचा भाग कापावा लागेल, पुढच्या सर्जरीसाठी व उपचारासाठी सत्तर हजारावर खर्च लागणार होता. मात्र हे करायला कुटुंबाची हिम्मत नव्हती.
बीडमध्ये ८ मार्चपासून भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि भारतीय साधारण विमा निगम च्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या शिबिरात अशोक आला. डॉ. नारायणदास व्यास यांनी पाहिले. ओमप्रकाश वर्मा नावाच्या सहायकाने मोजमाप करुन अशोकचा पाय कसा बनवायचा याचे निरीक्षण केले. तीन तासात मोजमापानुसार अ‍ॅबोनी फूट तयार केले. कॅलिपर लॉक, गुडघ्यासाठी वाटी, गुडघ्यापासून पंजापर्यंत फायबर व जयपूर फूटचा वापर यात केला. अपंगत्व असलेल्या पायाला जोडला आणि क्षणभरात अशोक विनाकुबडी कुठलाही आधार न घेता उभा राहिला. नंतर व्यास स्वत: त्याच्या सोबत २०-२५ फूट अंतरापर्यंत चालले, नंतर अशोक स्वत:च चालू लागला. वयाच्या १४ व्या वर्षी दुसरा पाय मिळाल्याने खूप आनंद झालाय. आता मी गावापासून नेकनूरच्या जि. प. शाळेपर्यंत ताठपणे पायांवर जाणार असल्याचे सांगत शिबीर आयोजकांना त्याने धन्यवाद दिले.

Web Title: Ashok will go to school with Jaypur foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.