शिवणकलेतून ९० महिलांना गवसला स्वावलंबनाचा राजमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:02 PM2018-04-13T17:02:02+5:302018-04-13T17:02:02+5:30

महिला स्वत:चा विकास करण्यासाठी आत्मविश्वासाने आणि धाडसाने पाऊल टाकत आहे. आज महिला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, साहित्य, कला, क्रीडा, प्रशासन इ. क्षेत्रांत सक्षम होताना दिसत आहे.

90 women became self-reliance from the sewing skill | शिवणकलेतून ९० महिलांना गवसला स्वावलंबनाचा राजमार्ग

शिवणकलेतून ९० महिलांना गवसला स्वावलंबनाचा राजमार्ग

googlenewsNext
ठळक मुद्देमागील तीन वर्षात परळी शहरातील ९० महिलांनी शिवणकला प्रशिक्षण घेऊन स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिक उन्नती साधली आहे. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कुटुंबीय महिलांकरिता व इतर महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.

परळी (बीड ) : महिला स्वत:चा विकास करण्यासाठी आत्मविश्वासाने आणि धाडसाने पाऊल टाकत आहे. आज महिला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, साहित्य, कला, क्रीडा, प्रशासन इ. क्षेत्रांत सक्षम होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील महिला आजही पुढे येण्यासाठी पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रयत्नशील दिसत नाही. परंतु ज्या महिलांनी कधी घरचा उंबरठा ओलांडला नाही त्या महिला आज स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने उभ्या झाल्या आहेत, ही किमया कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या व्यवसाय प्रशिक्षणातून साध्य झाली आहे. 

मागील तीन वर्षात परळी शहरातील ९० महिलांनी शिवणकला प्रशिक्षण घेऊन स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिक उन्नती साधली आहे. महिलांची आर्थिक उन्नती त्यांच्या क्षमतांचे संवर्धन आणि या सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचे कार्य येथील कामगार कल्याण केंद्रात होत आहे. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कुटुंबीय महिलांकरिता व इतर महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. वर्षभर चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गासाठी मंडळाच्या अधिनियमाखाली येणारे कामगार व त्यांच्या कुटुंबीयकरिता ७५ आणि  इतरांसाठी १५० रुपये  सतके नाममात्र वार्षिक शुल्क  आकारले जाते. 

शिवण कला प्रशिक्षणात  प्रात्यक्षिकांसाठी साहित्याची उपलब्धता कामगार कल्याण मंडळाकडून करून दिली जाते. दररोज तीन ते चार तास प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहेत.विविध प्रकारचे कापड शिवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. विधवा, घटस्फोटित, निराधार, पीडित या महिलाही शिवण  प्रशिक्षणाचा लाभ घेतात. प्रशिक्षित महिलांनी रोजगाराची वाट शोधली आहे. 

प्रशिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्वाचा विकास
प्रशिक्षण वर्गाव्यतिरिक्त  मंडळाच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबीर, कायदे विषयी मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, ताण- तणाव विषयी मार्गदर्शन, महिला समुपदेशन, ब्युटी पार्लर प्रशिक्षण दिले जाते. कर्तृत्ववान कामगार महिलांचा महिला दिनी विशेष सत्कार केला जातो. यासोबतच रांगोळी, मेंदी, पाककला, स्मरणशक्ती, वक्तृत्व, निबंध आदी स्पर्धा घेण्यात येतात. यामुळे त्यांना चालना मिळते. या प्रशिक्षण वर्गामध्ये कामगारांच्या महिलांना स्वयंरोजगार मिळण्यास मदत झाली आहे. गत तीन वर्षात ९० महिलांनी शिवण वर्गाचे प्रशिक्षण घेतले. राज्यातील सर्व केंद्रांमध्ये प्रशिक्षण वर्ग तसेच वर्षभरात विविध कार्यक्रम हाती घेतले जातात.

आत्मविश्वास वाढला
कामगार कल्याणच्या शिवण प्रशिक्षणामुळे रोजगार तर मिळाला, आत्मविश्वासही वाढला. पंजाबी ड्रेस व फ्रॉक  शिवता येतो आहे. घर चालवण्यासाठी माझा हातभार लागत आहे.
- ज्योती साखरे, कामगार पाल्य

स्वत:चा व्यवसाय सुरू केला
प्रशिक्षण घेतल्यानंतर आता घरीच स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू केला. १०० ते १५० रुपये रोजगार मिळतो. घरातील खर्च माझ्या कमाईतून भागात आहे याचा मला अभिमान वाटत आहे.
- सुमित्रा तिडके, कामगार पत्नी 

बचत झाली 
मी एसटीमध्ये वाहक आहे. नोकरीतून वेळ काढून प्रशिक्षण घेतले. शिवणकाम चांगले जमते. प्रशिक्षणामुळे स्वत:चे कपडे मीच घरी शिवते. यामुळे माझी आर्थिक बचत झाली.
- सुनीता वायभासे, कामगार, परळी आगार 

महिलांना स्वावलंबन मिळाले 
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. महिलांना घर चालविण्यासाठी आर्थिक हातभार मिळावा यासाठी शिवण वर्ग चालविले जाते. याला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळतो यातून बऱ्याच महिला स्वावलंबी झाल्या आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो.
- आरेफ शेख,  केंद्र संचालक, कामगार कल्याण केंद्र, परळी

Web Title: 90 women became self-reliance from the sewing skill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.