The pink season is cold, how about your skin? | आला गुलाबी थंडीचा महिना,कशी घ्याल तुमच्या त्वचेची काळजी ?


नोव्हेंबर महिना सुरु होताच हवेत काहीसा गारवा निर्माण होऊ लागला आहे. सकाळच्या वेळी पडणारे धुके आणि गारवा म्हणजे थंडीची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. थंडीचा सीझन आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं अशक्यच. गुलाबी थंडीची मजाच काही और असते. गुलाबी थंडी सुरु झाल्यानंतर सकाळी सकाळी लवकर उठून वॉकला जायला काहींना आवडतं. नियमितपणे काही जण मॉर्निंग वॉकचा आनंद घेतात. तर काहींना या गुलाबी थंडीच्या काळात अंथरुणातून बाहेर येऊच नये असं वाटते. थंडीच्या काळात भल्या पहाटे किंवा रात्री उशिरा गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायला कुणालाही आवडतं. मात्र गुलाबी थंडीचा आनंद घेत असताना काहींच्या शरीराला ती मानवत नाही. थंडीचा आनंद घेताना त्या वातावरणाचा शरीरावरही विपरीत परिणाम होत असतो. रुक्ष त्वचा, ओठ फुटणे, पायाला भेगा पडणे अशा त्वचेशी निगडीत त्रासदायक गोष्टींचा सामना अनेकांना करावा लागतो. गुलाबी थंडी सुरु झाल्यानंतर या त्रासदायक गोष्टींच्या पार्श्वभूमीवर विविध क्रीम्सच्या जाहिराती टीव्हीवर झळतात. या क्रीम लावल्यानंतर त्वचा ताजी राहिल असा दावा संबंधित कंपनीकडून करण्यात येतो. मात्र टीव्ही दाखवल्या जाणा-या उत्पादनांच्या वापरामुळे फायदा होण्यापेक्षा हानी अधिक होण्याचा धोका जास्त असतो. या उत्पादनांमध्ये वापरल्या गेलेल्या पदार्थांमुळे त्वचेला धोका निर्माण होण्याची भीती असते. त्यामुळे या उत्पादनांऐवजी घरगुती उपाय करण्याचा सल्ला अनेकजण देत असतात. घरगुती उपायच याबाबतीत फायदेशीर ठरु शकतात. गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळून लावण्याने त्वचा कोरडी होत नाही. घरातील दूधावरील साय किंवा ऑलिव्ह ऑईलनेही त्वचा ताजी राहते. कोको बटर क्रीमचा वापर करणंही उत्तम ठरु शकते. या क्रीमच्या वापरामुळे फक्त शरीराला सुंगध प्राप्त होतो असं नाही तर नियमित वापराने क्रीम खोलवर जात त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते. दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीआधी ऑलिव्ह ऑइलने शरीराला हलक्या हाताने मसाज करावे. जेणेकरुन शरीरातील मॉइश्चर कायम राहाण्यास मदत होते आणि त्वचा मऊ राहते. चेह-यासाठी त्वचेतील ओलावा कायम ठेवणा-या क्रीमची निवड करणं फायदेशीर ठरु शकते.

Web Title: The pink season is cold, how about your skin?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.