Beauty: Stone Massage Therapy! | Beauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुलवा सौंदर्य !

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यात सेलिब्रिटी तर सुंदर दिसण्याला प्राधान्यक्रम देतात. त्यासाठी ते विविध सौंदर्य प्रसाधनांच्या वापराबरोबरच नाविण्यपूर्ण प्रयोगही करताना दिसतात. विशेषत: सौंदर्याच्या बाबतीत बरेच संशोधन होऊन काही थेरपींचा उगमही झाला आहे. म्हणजे सौंदर्य खुलविऱ्यासाठी आणि आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विविध थेरपींचा वापर वाढताना दिसत आहे. त्यातील एक थेरपी म्हणजे स्टोन मसाज थेरपी होय. बहुतांश सेलेब्स आपले सौंदर्य आणि फिटनेस टिकविण्यासाठी स्टोन मसाज थेरपीचा वापर करतात.

* काय आहे स्टोन मसाज थेरपी?
मेकअपच्या इतर साधनांप्रमाणेच दगडाचा वापर करुन देखील आपल्या सौंदर्यात भर पाडता येते. स्टोन मसाज थेरपी ही अशी थेरपी आहे ज्यामध्ये नदीत आढळणाऱ्या दगडांचा वापर करुन मसाज केल्या जाते. त्वचेची कांती उजळण्यासोबतच विविध व्याधींवर उपचार म्हणूनही या थेरपीचा उपयोग केला जातो.
हॉट स्टोन मसाज थेरपीमध्ये गुळगळीत दगड विशिष्ट तापमानावर गरम करुन शरीरावर विशिष्ट केंद्रस्थानी (जसे पाठ, हात इ.) ठेवले जातात. काही दगड हातात घेऊन थेरपिस्ट स्नायूंना मसाज करतात. चिल्ड स्टोन मसाजमध्ये गरम ऐवजी थंड दगड वापरले जातात. हे दगड सामान्यत: संगमरवरी असतात. चिल्ड मसाजसाठी बर्फाच्या लादीत दगड ठेवून थंड केले जातात.

* या थेरपीचे फायदे
या थेरपीमुळे दगडातील उष्णता शरीरात शोषून घेतली गेल्याने स्नायूंमधील ताण कमी होतो. स्नायूंमध्ये आलेला ताठरपणा जाऊन ते लवचिक होतात. अवयवांमध्ये वेदना असतील तर त्या दूर करण्याचे काम या मसाजद्वारे केले जाते. दगडांमधील सौम्य उष्णतेमुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. खराब रक्ताभिसरणामुळे स्नायूतील ताण वाढून त्यात लॅक्टीक अ‍ॅसिडची निर्मिती व्हायला लागते.

रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने स्नायूंना मुबलक प्राणवायू पुरवठा होतो ज्यामुळे वेदना किंवा दुखणे नाहीसे होते. ही थेरपी तज्ज्ञांकडूनच करुन घ्यावी. कारण दगडाची उष्णता किंवा मसाज करताना दाब देण्याचे प्रमाण यात चूक झाली तर दुखणे बरे होण्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता असते. 
Web Title: Beauty: Stone Massage Therapy!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.