यंदा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाइलाजाने खेळाव्या लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 06:35 AM2018-11-30T06:35:51+5:302018-11-30T06:35:58+5:30

सायना नेहवाल; यंदाच्या मोसमातील वेळापत्रक तणावाचे

This year, many international tournament played in pressure | यंदा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाइलाजाने खेळाव्या लागल्या

यंदा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाइलाजाने खेळाव्या लागल्या

Next

मुंबई : ‘एकामागोमाग एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणे कधीही सोपे नसते. त्यात यंदा आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल व आशियाई अजिंक्यपद स्पर्धाही होत्या. त्यामुळे अनेकदा आम्हाला इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाइलाजाने खेळावे लागले,’ असे भारताची स्टार शटलर ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने म्हटले.  रसना नेटिव्ह हाट हनी आणि हनी व्हिटासाठी रसनाकडून सायना नेहवालची ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली. यावेळी सायनाने यंदाच्या मोसमाविषयी काही गोष्टी सांगितल्या.


यंदाच्या मोसमातील वेळापत्रक अत्यंत व्यस्त व तणावपूर्ण होते, असे सांगून सायना पुढे म्हणाली, ‘यंदाच्या मोसमात अनेक महत्त्वाच्या स्पर्धा होत्या. राष्ट्रकुल, आशियाई अजिंक्यपद व आशियाई क्रीडा या महत्त्वाच्या स्पर्धांसोबतच सुपर सिरिज आणि ग्रा. प्री. स्पर्धाही खेळायचे होते. त्यामुळे अनेकदा तयारीसाठी किंवा शारीरिक थकवा दूर करण्यासाठी खेळाडूंना पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळेच अनेक स्पर्धा आम्ही नाइलाजाने खेळलो आणि त्याचा परिणाम खेळावरही झाला.’


सायना पुढे म्हणाली, ‘यंदाचे वेळापत्रक व्यस्त राहिले असले, तरी मी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकण्यात यशस्वी ठरले याचा आनंद आहे. शिवाय डेन्मार्क ओपन व सय्यद मोदी स्पर्धेच्या अंतिम फेरीतही मी धडक मारली. महत्त्वाचे म्हणजे मी यंदा गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन केले होते. त्यामुळे मला माझ्या कामगिरीचा अभिमान आहे.’


‘तरीही अजूनही मला माझ्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास वाव असून पुढील सत्रामध्ये मी त्या गोष्टींवर अधिक लक्ष देऊन माझा खेळ आणखी सुधारण्याचा प्रयत्न करेन,’ असेही सायनाने यावेळी म्हटले.
२०१८ सालच्या तुलनेत २०१९ सालचे सत्र कमी धावपळीचे असेल, असे सांगताना सायना म्हणाली की, ‘पुढील वर्ष नक्कीच कमी दमछाक करणारे असेल. मात्र तरी हे आॅलिम्पिक वर्ष असल्याने अधिक सजगतेने खेळ करावा लागेल. यामुळेच २०१९च्या मोसमामध्ये प्रत्येक खेळाडू कठोर मेहनत घेईल, यात शंका नाही.’

Web Title: This year, many international tournament played in pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.