India Open: P. V. Sindhu in semifinals | इंडिया ओपन : पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत
इंडिया ओपन : पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत


नवी दिल्ली : गतविजेती आणि अव्वल मानांकीत पी. व्ही. सिंधू हिने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत धडक मारली. तिने स्पेनच्या बीटरिज कोरालेस हिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात नमवले. त्याचवेळी पुरुष गटात बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप या भारताच्या दावेदारांना पराभवाचा धक्का बसल्याने स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सिंधूने ३६व्या स्थानी असलेल्या कोरालेसविरुद्ध चांगलाच घाम गाळला. ५४ मिनीटांपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात सिंधूने २१-१२, १९-२१, २१-११ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना थायलंडच्या तिसºया मानांकीत रतचानोक इंतानोनविरुद्ध होईल.
इंतानोन हिने उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिचे आव्हान २१-११, २१-११ असे संपुष्टात आणले. दरम्यान, इंतानोनविरुद्ध सिंधू नेहमीच झुंजताना दिसली असून तिला इंतानोनविरुद्ध आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांतून केवळ दोन वेळा विजय मिळवण्यात यश आले आहे.
पुरुषांच्या गटात मात्र भारताच्या पदरी निराशा आली आहे. आठवे मानांकन लाभलेल्या बी. साई प्रणीतला तिसºया मानांकीत चीनी तैपईच्या चाउ टिएन चेनविरुद्ध १५-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी, अन्य सामन्यात अनुभवी पी. कश्यपचा चीनच्या कियाओ बिनविरुद्ध १६-२१, १८-२१ असा पराभव झाला. याशिवाय समीर वर्माही मलेशियाच्या इस्कंदर जुल्करनैनविरुद्ध १७-२१, १४-२१ असा पराभूत झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. (वृत्तसंस्था)

मी दुसºया गेममध्ये खूप चुका केल्या. सामना १९-२० असा असताना कोरालेसला नशिबाची साथ मिळाली. यावेळी तिने फटकावलेला शटल नेटला लागून माझ्या भागामध्ये पडला आणि सामना २०-२० असा बरोबरीत आला. असे झाले नसते तर मी तेथेच सामना संपवला असता. दीर्घ रॅली खेळताना मला त्रास होत होता आणि त्याचा कोरालेसने फायदा उचलला. एकूणच सामना चांगला झाला आणि आता मला पुढच्या सामन्यात आणखी चमकदार खेळ करावा लागेल.
- पी. व्ही. सिंधू


Web Title: India Open: P. V. Sindhu in semifinals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.