useful underseat space of scooter | स्कूटरच्या आसनाखालील बहुपयोगी जागा पण वापरताना जपून

स्कूटरच्या आसनाखालील जागा ही हेल्मेटसाठी प्रामुख्याने ठेवलेली असते. मात्र त्यात अनावश्यक वस्तू चेपून ठेवणे हे सातत्याने करणे चुकीचे आहे. त्याने हेल्मेटच्या काचेला धक्का पोहोचू शकतो तसेच सीटच्या लॉकचेही नुकसान होऊ शकते. स्कूटर हा प्रामुख्याने शहरी उपयोगातील वाहनाचा प्रकार झाला आहे. महिलांपासून ते अगदी काहीशा वृद्धांपर्यंत सर्वांना चालवण्यास सोपे असे हे वाहन वाटते, तसेच त्यामध्ये सामान ठेवण्यास चांगलीच जागा असते, हेच वैशिष्ट्य या स्कूटरचे असल्याने लोकांची जास्त पसंती स्कूटरला मिळत आहे.

मोटारसायकलच्या तुलनेत सामान वाहण्यास स्कूटरमध्ये असणारी आसनाखालील जागा हा स्कूटरसाठी असणारा एक प्लस पॉइंट. विशेष करून हेल्मेट ठेवण्यासाठी ही चांगली जागा आहे पण अनेकदा त्या जागेमध्ये हेल्मेटबरोबर अन्य वस्तू ठेवल्या जातात इतकेच नव्हे तर त्या अगदी चेपून बसवण्याचाही काही लोकांचा कल असतो. यामुळे मात्र ही जागा गच्च भरून जाते, मात्र त्यामुळे स्कूटरच्या आसन लॉक होण्यासाठी अगदी जोर लावून दाबले जाते. अशा प्रकाराने ही आसनाखालील जागा सातत्याने वापरली गेली तर त्या सीटचे लॉक खराब होण्याची शक्यता अधिक असते. विनाकारण अनावश्यक वस्तू कशाही प्रकारे कोंबल्या जाऊ नयेत, तसेच हेल्मेट सारख्या महत्त्वाच्या वस्तू नीट ठेवल्या जाव्यात हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

स्कूटरच्या या आसनाखालील जागेचा वापर करताना बेफिकिरीने केला जाऊ नये. विशेष करून हाफ हेल्मेट ठेवणाऱ्यांनी त्याबाबत विशेष काळजी घ्यावी. हेल्मेटला असलेल्या प्लॅस्टिकच्या काचेवर त्यामुळे दबाव येतो व त्याला क्रॅक जाणे वा तुटणे यामुळे हेल्मेट पूर्ण चांगल्या प्रकारे वापरण्यास अयोग्य ठरणे, हे टाळणे गरजेचे आहे. हेल्मेटला लावलेली प्लॅस्टिक व्हिजनची बाब तुम्हाला धुळीपासून व वाऱ्यापासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करीत असते. त्यामुळे हेल्मेटसाठी असणा-या या पुरेशा जागेत हेल्मेट नीट ठेवले जाईल याची काळजी घेतली जावी.

हेल्मेटची काच वा प्लॅस्टिक व्हिजन तुटल्यास नवे घेता येते हे खरे असले तरी तसा खर्च तुम्ही किती वेळा करणार आहात, दुसरी बाब प्रवासामध्ये धूळ व वाऱ्यापासून तुमच्या डोळ्याचे संरक्षण करणारी हेल्मेटची ही प्लॅस्टिकची व्हिजन-काच नीट राहणे, त्याला स्क्रॅच न जाऊ देणे हे देखील गरजेचे असते. यासाठीच स्कूटरच्या आसनाखालील जागेचा वापर करताना हेल्मेट ठेवण्यास प्राधान्य द्या पण ते ठेवल्यानंतर वस्तू कशाही कोंबण्याची धडपड करू नका. त्यामुळे हेल्मेटची ही काच, अन्य वस्तू ज्या नाजूक असतात त्याही खराब होण्याची शक्यता असते.

त्याचप्रमाणे लॉक खराब झाले तर तुम्हाला ते पुन्हा नवे बसवावे लागते किंवा अनेकदा ते नीट लागत नाही. अशा प्रकाराने स्कूटर रस्त्यावर पार्क करून महत्त्वाच्या वस्तू तशाच ठेवून निघून जाणेही धोक्याचे असते. सांगण्याचा मुद्दा असा की, हे सारे करताना तुम्ही तुमच्या आसनाखालील जागेचा, योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींचाही योग्य पद्धतीने विचार करण्याने तुम्ही तुमच्या स्कूटरच्या अशा अतिरिक्त भागांचे व हेल्मेटसारख्या महत्त्वाच्या साधनांची स्थिती चांगली राखण्यासही शिकले पाहिजे.


Web Title: useful underseat space of scooter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.