ठळक मुद्देसाधारण ३० रुपये फूट या दराने १ ते २ इंच रुंदीच्या पट्ट्या वेगवेगळ्या रंगात मिळू शकताततर ६० रुपये फूट या दराने मिळणारा रंगीत स्टिकर व विनिएल मिळू शकतोस्टिकर लावण्याची पद्धत असते, तसेच एक कलात्मक नजरही असावी लागते

मुंबई-पुणे या सारख्या शहरामध्ये वाहतुकीमध्ये कार चालवणे तसे क्लीष्ट काम असते.वाहने अगदी जवळजवळ जाण्याने काही वेळा बारीक व मध्यम स्वरूपाचे ओरखडे कारच्या रंगावर येतात. कधी आपल्याच इमारतीच्या पार्किंगमध्ये लहान मुले खेळताना कारशी खेळ करतात व त्यामुळेही स्क्रॅच वा ओरखडे येतात. कारवर आलेल्या या ओरखड्याने कार मालकाचा जीव मात्र चांगलाच वरखाली होत असतो. काहीवेळा फार मोठे ओरखडे नसतात पण एकाच ठिकाणी पाच सात रेषा उमटलेल्या दिसतात. रंग काहीसा खरवडलेला दिसतो.कधी चाकाच्या मडगार्डच्या वर कार वळवताना ती बाजू कधी कुठे घासली जाते ते समजत नाही. हे सारे रंगकाम करायचे म्हटले की भरपूर वेळ जाणार व पैसे जाणार.

डेंटिंग व पेंटिंगचे काम म्हटले की किमान २००० रुपये तरी जाणारच हे ठरलेले असते. इतके करून कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला गेलात तर तेथे दरवाज्यावर ओरखडा असेल तर त्या ओरखड्याला नव्हे तर पूर्ण दरवाज्याला पेंट करायला लागते. त्यांना छोटी कामे परवडत नाहीत. त्यासाठी कारणेही बरीच दिली जातात. अशा स्थितीत कार मालकाच्या मनावर व भावनेवरही स्क्रॅचमुळे ओरखडा पडलेला असतो. अशावेळी स्टिकर्स वा विनिएल- डिकॅलचा वापर हा अतिशय चांगला उपाय ठरू शकतो. स्वतःलाही त्यानुसार काम करून घेता येते वा स्वतः कामही करू शकता.

अर्थात स्टिकर लावणे हे एक कौशल्य आहे. मोठा स्टिकर लावायचा की छोटा,स्टिकर्सची पट्टी तयार मिळते, ती घेऊन वेगळेच रेषांचे डिझाईन त्यावर करायचे की गोल स्टीकर लावून काम भागवायचे हा निर्णय मात्र तुम्ही ओरखड्याप्रमाणे व आकाराप्रमाणे व खिशाला परवडेल अशा दृष्टीनेच घ्यावा. खरं सांगायचे तर स्क्रॅच रिमूव्हरच्या पेनच्या जाहिरातींना भुलून जाऊ नये. त्यापेक्षा ही देशी पद्धत अनुसरायला काहीच हरकत नाही.दोन्ही बाजूला मोठ्या डिकॅलचा वापरही तुम्ही करू शकता. त्यामुळेही कारवरील स्क्रॅच तर वाचतील व भविष्यात तेथे ओरखडा रंगावर उठण्याआधी त्या प्लॅस्टिकवर त्याचा परिणाम होईल.

बाजारामध्ये अशा प्रकारचे स्टिकर्स मिळतात. साधारण ३० रुपये फूट या दराने १ ते २ इंच रुंदीच्या पट्ट्या वेगवेगळ्या रंगात मिळू शकतात, तर ६० रुपये फूट या दराने मिळणारा रंगीत स्टिकर व विनिएल मिळू शकतो. ब्लेड व पट्टीच्या सहाय्याने तो कापून घेता येतो. पट्टी तयारही मिळते. तुम्ही कारच्या जवळच्या शेडमधील रंग वापरून किंवा तुम्हाला जर कारसारखा रंग असलेला स्टिकर मिळाला तरीही त्यातचा वापर करू शकता. त्यामुळे रंगकामाचा खर्च वाचतो. तसेच आतील भाग गंजण्यापासूनही काही प्रमाणात वाचतो.

शाळेत पूर्वी हस्तकलेचा तास असे, त्याप्रमाणे येथेही हे काम हौशीने करायचे म्हटले तरी सोपे आहे. स्टिकर लावण्याची पद्धत असते, तसेच एक कलात्मक नजरही असावी लागते. ती तुमच्याकडे असेल तर छान अन्यथा तशासाठी काम करून देणारे कलाकारही असतात. थोडक्यात या कामामुळे गाडीच्या रंगावरील खर्च वाचतो, पुन्हा पुन्हा येणारे ओरखडे तेथे पडत नाहीत. कारला एक वेगळा लूकही तुम्ही देऊ शकता.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.