दुचाकी ही अनेक सर्वसामान्यांचे व विशेष करून शहरी व निमग्रामीण भागातील चाकरमान्यांचे नित्याचे दळणवळणाचे साधन झाले आहे. कोणे एकेकाळी स्कूटर वा मोटारसायकल रात्रीच्यावेळी चालवू नका, असे घरचे लोक सांगत. आता मात्र तशी वेळ येत नाही, एकंदर लोकांची बदललेली जीवनशैली, मोठे रस्ते,कामासाठी दिवस रात्र जावे लागण्याची गरज, दुचाकीचे चांगले हेडलॅम्प, दुचाकी चालकांचेही वाढलेले प्रमाण यामुळे एकूण दुचाकी वापरण्यासाठी दिवस व रात्र असे काही राहिलेले नाही. मात्र या सर्व बाबी जरी उपयुक्त वाटत असल्या तरी अनेक दुचाकी स्वार विशेष करून शहर, ग्रामीण व निमग्रामीण भागात आपल्या दुचाकीच्या टेललॅम्पबाबत खूपच बेफिकिर असतात, असे दिसते. रात्रीच्यावेळी दुचाकी रस्त्यातून जात आहे, हे मागील वाहनाला समजण्याचा एकमेव संकेत, म्हणजे त्या दुचाकीच्या मागील लॅम्प. या टेललॅम्पमध्ये टेललॅम्प व ब्रेकलाइट हे दोन महत्त्वाचे संकेत असतात. मागील वाहनाला त्यामुळे अनेक बाबींचे संकेत दिले जातात.टेललॅम्पप्रमाणेच साइड इंडिकेटरही अनेकांकडून दुर्लक्षित असतात. खरे म्हणजे आरटी नियम वगैरे बाजूला ठेवा. पण किमान स्वतःच्या प्राणाची तरी काळजी करा असे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. अलीकडेच एक कोटी दुचाकींची विक्री भारतात झाल्याने दुचाकी उत्पादकांच्या खुशीत भर पडली आहे. मात्र या दुचाकी घेणाऱ्यांना केवळ सायकलीच्याऐवजी स्कूटर वा मोटारसायकल घेत आहोत, असे वाटत असावे. किंबहुना स्कूटर वा मोटारसायकल रस्त्यावर तुम्ही जेव्हा आणता, तेव्हा आरटीओचे नियम त्याला लागू असतात. त्यापेक्षा जास्त महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही रस्त्यावरून जाताना मागून येणाऱ्या वाहनाला तुमच्या दुचाकीचा अंदाज येणे,संकेत मिळणे गरजेचे असते. विशेष करून महामार्गावर वेगाने जाणारे वाहन दुचाकीला टेललॅम्प नसल्यास धडक देऊ शकते. अशा प्रकारे झालेल्या अपघातांमध्ये साहजिकच दुचाकीस्वार व त्यावरील प्रवासी यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. त्याला धडक देणाऱ्या वाहनाचा आकार मोठा असेल तर त्याला त्याचे फार काही नुकसान सहनही करावे लागणार नाही. मात्र दुचाकीस्वारांनी आपले प्राण व सुरक्षितता ही जोपासलीच पाहिजे.त्यासाठी टेललॅम्प, साइड इंडिकेटर्स हे महत्त्वाचे असतात. अनेक दुचाकीस्वार हे हेडलॅम्प चालू आहे ना मग पुरे असा घातकी विचार करून आपले वाहन रस्त्यावर आणतात. वास्तविक गेल्या काही वर्षांमधील अपघात व ते होण्याच्या पद्धती यांचा विचार केल्यास मोटारसायकल, स्कूटर यांचे संकेत न मिळणे, त्यांच्या चालवण्यामधील त्रुटी यांचा समावेश आहे. अनेकदा एकापेक्षा जास्त व्यक्तींनाही नेतानाही अपघात झाले आहेत. हा सर्व विचार अतिशय गंभीरपणे करून प्रत्येक दुचाकी मालक व चालकाने आपली दुचाकी रात्री चालवताना आपल्या मोटारसायकलीचे हेडलॅम्पच नव्हे तर साइड इंडिकेटर्स, टेललॅम्प, ब्रेकलाइट हे चालू स्थितीत ठेवण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. वाढत्या वाहनांची व वाहतुकीची पार्श्वभूमी तसेच वाहतूक नियमांचे पालन यासाठी सुजाण व सुरक्षित नागरिक म्हणूनही त्यांची ती जबाबदारीच नव्हे का?