सेदानचे प्रेस्टिज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:14 PM2017-07-25T12:14:42+5:302017-07-25T16:34:26+5:30

सेदान कार हा एक्झिक्युटिव्ह स्तरावरच्या वा उच्चपदस्थ, उच्चभ्रू लोकांच्या दैनंदिन वापरासाठी मानाचा प्रकार वा प्रेस्टिजचा भाग वाटत होता. अद्यापही ही मानसिकता कायम आहे.

Sedan's Prestige | सेदानचे प्रेस्टिज

सेदानचे प्रेस्टिज

Next

सेदान कार हा एक्झिक्युटिव्ह स्तरावरच्या वा उच्चपदस्थ, उच्चभ्रू लोकांच्या दैनंदिन वापरासाठी मानाचा प्रकार वा प्रेस्टिजचा भाग वाटत होता. अद्यापही ही मानसिकता कायम आहे. कार्यालयांमध्ये उच्चपदस्थ असणाऱ्यांना सेदानलाच (sedan) जास्त महत्त्व द्यावेसे वाटते. अलीकडच्या काळात मात्र एसयूव्ही प्रकारातील अतिउच्च श्रेणी व सुविधा असलेल्या मोटारींचा वापरही या वर्गामध्ये वाढू लागला आहे. अन्यथा आतापर्यंत या विशिष्ट वर्गातील लोकांना सेदान असणे हा प्रेस्टिजचा भाग वाटत होता. मुळात भारतात या सेदान पद्धतीच्या मोटारींचे प्रमाण अधिक होते. हॅचबॅक हा प्रकार मारुती सुझुकी कंपनीच्या मोटारी आल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. त्यापूर्वी प्रीमियमर, फियाट व अॅम्बेसेडर या सेदान प्रकाराच्याच मोटारी होत्या व त्यातही अॅम्बेसेडर व त्या आधीच्या शेवरले, फोर्ड व अन्य परदेशी कंपन्यांच्या शाही मोटारी या देखील सेदान प्रकारतील असल्याने सेदानला एक विशिष्ट वलय मिळाले होते.
सेदान म्हणजे लांबीला जास्त असणारी, रुंदीलाही प्रशस्त असणारी व मागील बाजूस डिक्की असणारी कार. मोठे बॉनेट असणारी कार. सर्वसाधारणपणे बसण्यासाठी प्रशस्त असणाऱ्या सेदानची भुरळ त्यामुळेच पडली. सेदानमध्ये बसल्याने एक वेगळे अस्तित्त्व मिळत असावे, आसनव्यवस्था व आरामदायीपणे बसण्याची सोय असलेल्या सेदान मोटारींचे इंजिन व त्यांची ताकद ही मोठी असून लांबच्या प्रवासालाही खऱ्या अर्थाने आरामदायी असतात. पाठीला त्रास कमी होतो व पाय बऱ्यापैकी लांबही करता येतात. पालखी या मूळ संकल्पनेतून सेदानचे आरेखन तयार झाले आहे. सेदानमध्ये या रचनेमुळे खड्ड्यांच्या रस्त्यावरही आत बसणाऱ्या मागील रांगेतील आसनावरील व्यक्तीही प्रवासात न उडता बसतात. जास्त जागा व्यापणारी सेदान ही रस्ता धरून धावणारी मोटार असते. वेगही चांगला पकडू शकते, लांबच्या प्रवासात वाहन चालवताना अतिशय आरामदायीपणे वाहन चालवता येते, मुळात प्रशस्तपणा हा सेदानचा गुण असल्यानेच सेदानची लोकप्रियता टिकून आहे. पूर्णपणे प्रवासी कार म्हणावी लागेल कारण त्यात सामान वाहण्याचा भारतीय रफटफ मानसिकतेचा भाग नाही. त्यासाठी असलेल्या मोठ्या डिक्कीचा वापर केला की पुरे त्यामुळे आतमधील माणसाला सामानाची फिकीर करायची गरज नाही. बसण्याच्या आसनव्यवस्थेमधील रचनाही कोचावर रेलून बसण्यासारखी असल्याने सेदान चालवण्यापेक्षा मागे बसून शाही प्रवास घडवू शकते, हेच सेदानचे मुख्य लक्षण आहे, असे अनेकांचे मत असेल तर नवल नाही.

Web Title: Sedan's Prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.