ठळक मुद्देपादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगसारखे पट्टे आखून देऊन त्यांनी कुठून रस्ता क्रॉस करावा हे स्पष्टपणे सांगितलेले असतेमात्र अनेक शहरांमध्ये या सांकेतिक अशा पट्ट्यांचा वा रेषांचा अर्थ समजून त्याचे पालन होत नाही

वाहनांच्या वाहतुकीच्या नियमांमध्ये रस्त्यावरील संकेत फलकांप्रमाणेच रस्त्यावर मारलेल्या विशिष्ट पद्धतीच्या पांढऱ्या रेषा वा पांढरे पट्टे हे देखील वाहनांच्या वाहतुकीसाठी असलेल्या नियमांचाच एक भाग आहे. वाहन चालकांना सूचना देणाऱ्या पट्ट्यांच्या विशिष्ट प्रकारे असलेल्या आरेखनाद्वारे हे पट्टे त्या ठिकाणी वाहन चालकांनी कोणते नियम वाहन चालवताना पाळावेत, वाहन कसे चालवावे, याचे मार्गदर्शन करण्यासाठी असतात. अगदी पादचाऱ्यांसाठीही झेब्रा क्रॉसिंगसारखे पट्टे आखून देऊन त्यांनी कुठून रस्ता क्रॉस करावा हे त्यांना स्पष्टपणे सांगितलेले असते. मात्र अनेक शहरांमध्ये या सांकेतिक अशा पट्ट्यांचा वा रेषांचा अर्थ समजून त्याचे पालन केले जात असल्याचे आढळून येत नाही. आज मुंबईसारख्या शहरांमध्ये वाहतुकीचे संचालन सुरळीत व्हावे, अनावश्यक व अयोग्य पद्धतीने वाहने आपल्या रांगा मोडून जाऊ नयेत अन्यथा त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होते

रस्त्यांवरच्या या पांढऱ्या रेषा वा पट्टे व त्यांचे नेमके अर्थ काय आहेत ते पाहाण्यासारखे आहेत.अनेकांना त्याचा अर्थ खरोखरच नीट ठाऊक नसतो. मात्र नागरिक म्हणून तो प्रत्येकाने समजून प्रत्यक्षात त्याचा वापर करणे गरजेचे आहे.

पांढरे व पिवळे पट्टे

रस्त्यावर असणारे पांढरे व पिवळे पट्टे हे देखील वाहनचालकांना सूचना देणारे असतात.

सलग पट्टे

यामध्ये रस्त्यावर दोन सलग पट्टे जे तुटक नसतात असे आखलेले असतात. त्याच्या संकेतानुसार या पट्ट्यानुसार असलेल्या रस्त्याच्या भागांनुसार पट्टा ओलांडून रांग मोडू नये.

दोन पांढरे पट्टे व त्यात एक तुटक व एक सलग पट्टा

दोन पांढरे पट्टे त्यात एक तुटक व एक सलग अशा पद्धतीने रस्त्याच्या मध्यभागी आखलेल्या संकेताचा अर्थ म्हणजे त्या रस्त्यावरील डाव्या बाजूच्या रांगेतील वाहनाने रांग ओलांडू नये.

तुटक पांढरा पट्टा

एकच पांढरा आखीव पण काही अंतराने तुटक दाखविलेला पट्टा हा रस्त्याच्या रांगेचा आखीव मार्ग दर्शवितो. त्यात दोन रांगा रस्त्यावर निश्चित केलेल्या असतात.

रस्त्याच्या मध्यभागी थोड्या अंतरावर तुटक स्वरूपात असेलेला पांढरा पट्टा रस्त्याच्या मध्याची खूण दाखवितो. अशाच प्रकारचा मध्यभागी असणारा पण काही अंतरावर तुटक असलेला पांढरा पट्टा हा ही रस्त्याच्या मध्य भागाची खूण दाखवितो.

पांढरा वर्तुळाकार भाग

वाहतूक बेट असते तेथे मध्यावर पांढरा वर्तुळाकार रंगविलेला भाग असतो. तेथे वाहतूक बेटाच्या सभोवताली असलेल्या वाहनांना प्राधान्य द्याावे असे सुचवितो.

पादचारी मार्ग

पादचारी मार्ग म्हणजे रस्त्यावर आडव्या दोन पांढऱ्या पट्ट्यांमध्ये तिरक्या पांढऱ्या रेषा आखलेल्या असतात. तसेच वाहनाच्या दिशेनुसार एका आडव्या पांढऱ्या पट्ट्यांच्या आधी दोन पांढऱ्या रेषा आखलेल्या असतात. या दोन पांढऱ्या रेषांपूर्वी वाहन थांबवायचे असते.सिग्नलच्या ठिकाणी असणारे हे संकेत असून साधारण या पादचारी मार्गाला झेब्रा क्रॉसिंग म्हणून ओळखले जाते.

बाण, पिवळे पट्टे

सरळ रस्ता , डाव्या बाजूने जाणारा रस्ता दाखविणारे पट्टेही रस्त्यावर बाणाने दाखविलेले असतात. याशिवाय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रस्ता पिवळ्या रंगाच्या पट्ट्याने मध्यभागी दुभाजित केला असेल तर त्याठिकाणी ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांनी त्या पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर म्हणजे दुसऱ्या रांगेत जाऊ नये.

सर्वसाधारण रस्त्यावर सिमेंटचे दुभाजक नसतात त्या ठिकाणी अशा पट्ट्यांचा अतिशय गांभीर्याने वापर करायला हवा. ही सारी चिन्हे केवळ दर्शनासाठी नाहीत तर प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षित वर्दळीसाठी आहेत. ती चिन्हे आदेशाची असोत वा माहितीची त्याचा अर्थ लक्षात घेऊन वाहनांचे चालन व्हायला हवे. त्यात कोणाचा मानापमानाचा भाग नाही तर सुबुद्ध नागरिक म्हमून कायदेपालनाचा भाग आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.