Make a rubber cover for a motorcycle break pedal | मोटारसायकलीच्या ब्रेक पेडलला रबरी कव्हर जरूर लावा

सर्वसामान्यांच्या दृष्टीने मोटारसायकल ही नित्याचे दळणवळणाचे साधन झालेली आहे. अनेकदा छोट्या छोट्या बाबींकडे मात्र या मोटारसायकल वापरणाऱ्यांकडून दुलर्क्ष केले जाते व आयत्यावेळी काही तरी समस्या निर्माण झाल्यानंतर पंचाईत होते. इतकेच नव्हे तर काहीवेळा अपघातही होतो. मोटारसायकल वापरणाऱ्या काही लोकांशी चर्चा केल्यानंतर हा प्रकार आढळून जो, अतिशय मामुली वाटणारा असला तरी तितकाच महत्त्वाचा आहे. भारतात मोटारसायकलीला ब्रेक हा उजव्या बाजूला असतो. उजव्या पायाने हा ब्रेक दाबला जातो. मोटारसायकल कंपनीकडून या ब्रेकला अॅल्युमिनियम वा लोखंडाचे पेडल दिलेले असते. त्या पेडलला चौकोनी भाग टोकाला असतो, त्यामुळे तुम्हाला ब्रेक दाबताना त्रास होऊ नये. मोटारसायकलीला असणारे हे पेडल व त्याला असलेला हा चौकोनी आकाराचा पुढील भाग, त्यावर तुम्ही पाय दाबून ब्रेक कार्यान्वित करीत असता. मात्र कालांतराने या चौकोनी भागावर असणारे विशिष्ट प्रकारचे डिझाईन जे तो चौकोनी भाग तुमच्या पायाखालून सटकू नये म्हणून तयार केलेले असते, ते गुळगुळीत होते व ब्रेक दाबताना तुमच्या पायातील पादत्राण जर ओले झाले असेल तर ब्रेकवरून पाय सटकून ब्रेक लागत नाही किंवा जोराने झटका बसल्यासारखा लागू शकतो. 
मोटारसायकलीचा ब्रेक हा अतिशय महत्त्वाचा घटक असून जसा ब्रेक नीट आहे की नाही ते पाहाताना, त्याची वायर, लायनर वा डिस्कब्रेक असेल तर संलग्न बाबी तुम्ही मेकॅनिककडून तपासता व दुरूस्त करता तसेच ब्रेक पेडलवर रबर जरूर लावण्याचेही ध्यानात ठेवा. पावसाळ्यामध्ये विशेष करून पादत्राणाचे तळ ओले असताना पाय त्या ब्रेक पेडलवर ब्रेक दाबताना सरकू शकतो, त्यामुळे आवश्यक त्या पद्धतीने ब्रेक लावता येत नाही. त्यावेळी तुमचा पाय ब्रेकला सरावलेला असल्याने तो आपोआप स्वतः जुळवूनही घेत असतो. पण या प्रक्रियेत काही अडथळा आल्यास काही बारीक अपघातही घडू शकतो. अगदी त्याचप्रमाए पादत्राणांच्या तळाला पाणी लागल्यास, चिखल व शेण लागल्यासही पावसाळ्या व्यतिरिक्त ही स्थिती उद्भवू शकते.यासाठी ब्रेर पैडलच्या चौकोनी भागावर रबराचे आवरण जरूर लावून घ्या. काहीवेळा सुरुवातीला लावलेले हे आवरण निघूनही गेलेले असले तरी ते नियमितपणे निट आहे की नाही, ते पाहा. अनेकजण ब्रेक वापरासाठी पूर्ण पाय त्या पेडलवर ठेवत असतात, त्यांना ही समस्या जाणवतही नसेल. मात्र काहीजण पायाचा बोटांच्या भागाने पादत्राणाचा पुढचा टोकाचा भाग वापर करतात. अशावेळी पादत्राणाचा तळवा ओला असेल तर ही समस्या उद्भवू शकते. दिसायला ही अतिशय छोटी बाब असली तरी अतिशय महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.