वाईट वेळ कोणावर सांगून येत नाही, पण जेव्हा जेव्हा कोणावर तशी वेळ येते, तेव्हा तेव्हा प्रत्येकाने आपला मदतीचा हात नेहमीच पुढे करायला हवा. रस्त्यावरील अपघाताच्यावेळी तर याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. मग तो वाहन चालक असो, वाहनातील सुखरूप असणारी व्यक्ती असो, अन्य वाहनांमधील प्रवासी असोत की पादचारी असो. 

रस्त्यावर होणाऱ्या अपघाताच्यावेळी अनेकदा माणसांमधील माणुसकी संपलेली असल्याचे चित्र सध्या अनेक अपघातांमध्ये दिसते. काही मोजकी लोक आपले माणुसकी निभावण्याचे भावनिक कर्तव्य पार पाडत असतात, मात्र अनेकजण त्यापासून काही बोध न घेता केवळ बघ्याची भूमिका घेतात. अलीकडेच नवी मुंबईत झालेल्या एका स्कूटर अपघातात एका महिलेचा रस्त्याच्या बाजूला असलेल्या खराब भागांमुळे स्कूटरचा तोल जाऊन मागून येणाऱ्या डंपरखाली येऊन अतिशय भीषण मृत्यू झाला. त्या डंपरचालकाची चूक नव्हती मात्र तो पळून गेला पण त्याहीपेक्षा मागून येणार्या वाहनांपैकी कोणीही त्या महिलेच्या मदतीसाठी आले नव्हते. विशेष म्हणजे ही अतिशय संतापजनक बाब सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये चित्रित झाली, खासगी वृत्तवाहिन्यांवरही तो प्रसंग दाखवण्यात आला होता.

वास्तविक कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यानंतर त्या अपघातग्रस्त व्यक्ती वा व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रत्येकाने शक्य तितके प्रयत्न करायला हवेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयातही दाखल करून घेताना त्या जखमी व्यक्तीला आणणार्या व्यक्तीला आज पोलिसांकडून विचारणा वा त्रासही होत नाही. असे असताना ज्यांचा अपघाताशी संबंध नसतो, त्यांनी पुढे येऊन अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयापर्यंत नेण्यास काहीच हरकत नाही. नव्हे तसे करणे हे त्यांचे प्रत्येक नागरिकाचे व माणूस म्हणून कर्तव्य आहे. दुर्दैवाने लोक आज तेच विसरत चालले आहेत.अपघाताच्यावेळी मागून येणार्या अन्य वाहनांमधील कोणी उतरूनही ते काम केले नाही की जवळपास असलेल्या व्यक्तीनेही त्या महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली नाही. अखेर पोलिसांना ते लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली.मात्र त्या महिलेच्यादृष्टीने सारेच संपले होते. अशा प्रकारच्या विविध घटनांच्यावेळी प्रत्येकाने आपले मदतीचे हात पुढे केले पाहिजेत. अपघातात जखमीची स्थिती काय आहे, ती शुद्धीवर आहे का, हे पाहून त्या व्यक्तीला सावकाश बाजूला घेऊन, धीर देत, बेशुद्ध वा मूर्च्छित नसल्यास पाणी पाजण्याचे, शुद्धीवर नसल्यास शुद्धीवर आणण्यासाठी मोकळ्या जागी नेण्याचे काम नक्कीच केले पाहिजे. 

पोलिसांना वा रुग्णवाहिकेलाही बोलावण्याचे कर्तव्य कोणी ना कोणी पार पडेल यावर अवलंबून न राहाता स्वतःच्या खिशातील मोबाइलवरून तशी माहिती त्यांना देण्यास काहीच हरकत नाही. अन्य वाहनांमध्ये प्रथमोपचार साहित्य असले पाहिजे. त्या त्या वाहनचालकांनीही त्याप्रसंगी तेथे थांबून त्या व्यक्तीला प्रथमोपचाराची मदत केली पाहिजे. अपघातग्रस्त व्यक्तीचे सामान, त्याच्या वाहनाचे रस्त्यावर काही अडथल्यासारखे असलेले अवशेषही बाजूला करून अन्य वाहनांची वाहतूक कोंडी होणार नाही, इतके पाहिले पाहिजे. त्या जखमी व्यक्तीला आपल्या वाहनातून रुग्णालयात नेण्याचे कामही तातडीने व जबाबदारीने केले पाहिजे. यामध्ये माझा वेळ किती जाईल,मला काय करायचे आहे, असा अयोग्य विचारांमध्ये कधीही वावरू नये. किंबहुना माणुसकीचे भान आज प्रत्येकाला खर्या अर्थाने येण्याची गरज आहे.