ठळक मुद्देआयएसाय मार्क असलेली हेल्मेट्स जी स्कूटर व मोटारसायकल स्वारांसाठी असतात, तीच घ्यायला हवीतत्यामध्ये केलेली रचना व वापरलेली साधने ही नक्कीच अधिक सक्षम असतातउन्हाचा त्रास होतो तर गॉगल लावणे, वा गॉगल ग्लास असणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे शक्य आहे

मोटारसायकल असो, स्कूटर असो वा अगदी इलेक्ट्रिकवर चालणारी स्कूटी. दुचाकी चालवताना चालवणाऱ्याने वा त्या मागे बसणाऱ्यानेही हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. तो नियम आहे, वाहतूक नियमामध्ये त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आहे. हेल्मेटमुळे कोणत्याही प्रकारच्या अपघातात दुचाकीस्वारांच्या डोक्याला होणारी इजा कमीतकमी होते.किंबहुना अनेकदा होत नाही. मात्र त्या हेल्मेट सक्तीला अनेकांनी धुडकावून लावले आहे.उन्हाळ्यामध्ये त्रास होतो, पावसात चालवताना समोरचे नीट दिसत नाही, ते जड ओझे कुठे नेणार अशी अनेक कारणे पुढे करीत अनेकजण हेल्मेट वापरण्याचे टाळतात. वाहतूक पोलीस अडवतात व दंड वसूल करतात, त्यांच्या पद्धतीने ते समजवतात, काही अधिकारी हेल्मेट विकत आणून देण्याचाही उपक्रम करतात. पण यातून लोकांनी बोध घेतलेला नाही.

अपघातात हेल्मेटमुळे डोक्याला होणारी संभाव्य इजा किमान गंभीर होत नाही. अर्थात मोठ्या अपघातांमध्ये काहीवेळा त्याचाही उपयोग होत नाही. मात्र त्याचा अर्थ हेल्मेट ही संकल्पनाच कुचकामी आहे, असा अजिबात नाही. लोकांनी मनावर घेतले तर ते लोक करतात. हेल्मेट न वापरणे ही एक स्टाइलही बनलेली आहे. मुळात ते कशासाठी आहे ते समजून घेण्याची जशी गरज आहे, तसेच हेल्मेट वापरण्याने तुम्ही कायद्याचे पालन करीत आहात, हे देखील तितकचे महत्त्वाचे आहे. कायद्याचे पालन करणे हेच अनेकांना मान्य नसते, त्यांच्या मते हे चुकीचे आहे, कायदा बनवताना हेल्मेट तयार करणाऱ्या उत्पादकांचे भले करण्याचा हा प्रकार आहे. मात्र असा विचार करणेही चुकीचे म्हणावे लागते. मुळात हेल्मेटची आवश्यकता प्रत्येक दुचाकीधारकांना वाटली पाहिजे. मोटारसायकल व स्कूटरवरून आपल्या कुटुंबकाफिल्यासह तीन ते पाच जणांना वाहून नेणारा व फक्त स्वतः हेल्मेट घालणारा माणूस पाहिला तर तो त्याचा सोयीचा भाग नसून तो स्वार्थीपणा व कायदा धुडकावून लावण्याचेच वर्तन ठरते. मुलाबाळांना नेताना मर्यादेपेक्षा जास्त लोकांना नेताना त्यांच्या डोक्याचा तरी विचार कर बाब, असे सांगण्याची गरज वाटू लागते.

हेलमेटचे आज विविध प्रकार आहेत. आयएसाय मार्क असलेली हेल्मेट्स जी स्कूटर व मोटारसायकल स्वारांसाठी असतात, तीच घ्यायला हवीत. त्यामध्ये केलेली रचना व वापरलेली साधने ही नक्कीच अधिक सक्षम असतात. गरम होते जास्त असे म्हणणाऱ्यांना हाफ हेल्मेट वापरता येते, उन्हाचा त्रास होतो तर गॉगल लावणे, वा गॉगल ग्लास असणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे शक्य आहे. आज स्कूटर्सना एक हेल्मेट ठेवण्यासाठी असणारी जागा पुरेशी आहे. बाईक्सना पूर्ण डोके कव्हर करणारे हेल्मेट घेतले किंवा हाफ हेल्मेट व पूर्ण हेल्मेट यांचे एकत्रित तंत्र वापरून असलेले हेल्मेट घेतले तर ते मोटारसायकलीला लॉक करून ठेवता येते. म्हणजेच हेल्मेट चोरीला जाण्याचा संभव कमी असतो. या स्थितीतही हेल्मेट न वापरणे हे स्वतःच्या प्राणाला दोक्यात घालण्याबरोबरच कायद्यालाही धाब्यावर बसवण्यासारखे आहे. देश व नागरिक म्हणून स्वतःला अभिमानाने भारतीय म्हणणाऱ्यांनी खरे म्हणजे हेल्मेट वापर करून कायद्याचे पालन करून अभिमान बाळगायला काहीच हरकत नाही.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.