डॅशबोर्ड म्हणजे हलके सामान ठेवण्यासाठी असलेली जागा नव्हे

By ऑनलाइन लोकमत on Sat, October 28, 2017 9:29am

डॅशबोर्ड म्हणजे वस्तू ठेवण्याचे टेबल नव्हे. त्यामुळे त्यावर वस्तू ठेवलेल्या असल्यास त्या कार चालू असताना घसरून ड्रायव्हरच्या अंगावर येऊ शकतात. त्यामुळे अपघातासही निमंत्रण दिल्यासारखे असते.

कारमधील डॅशबोर्ड म्हणजे प्लॅस्टिक वा तत्सम घटकांनी तयार केलेले एक स्टिअरिंग व्हीलसमोरचे टेबल असते, ती जागा तुमच्या लहान मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी तयार केलेली असते, असा गैरसमज अनेकांनी करून घेतलेला असतो. मुळात प्रत्येक कारमध्ये डॅशबोर्ड हा विविध पद्धतीने तयार केलेला असतो. आधुनिक कारमध्ये असलेल्या या डॅशबोर्डमध्ये कारच्या कंट्रोल पॅनेलचे इंडिकेटर्स लावण्यासाठी, म्युझिक सिस्टिम वा एअरकंडिशनची बटणे लावण्यासाठी व त्यानुसार तेथे संलग्न असलेल्या कप्प्यामध्ये सामान ठेवण्यासाठी जागा असते. पूर्वीच्या काळी घोडागाडी असे. त्या गाडीच्या गाडीवानाच्या अंगावर घोड्याच्या डापामुळे वा पुढून उडणाऱ्या चिखलामुळे कपडे खराब होऊ नये व पुढील भाग खराब होऊ नये यासाठी एक लाकूड वा चामड्याचा अडथळा वा फळकूट लावलेले असे, त्याला डॅशबोर्ड म्हणत. कालांतराने तो शब्द कारच्या रचनेमध्ये आणला गेला तो परत वेगळ्या अर्थाने. 

सध्याच्या आधुनिक कारमध्ये विविध प्रकारचे इंडिकेटर्स वा गेज लावलेले असतात. त्यामुळे ड्रायव्हरला कारमधील काही त्रुटींची, संकेतांची माहिती मिळते. वायरिंग करून सेन्सर्सद्वारे हे संकेत त्या इनस्ट्रुमेंट पॅनेलमध्ये दिसतात. त्यासाठी हा डॅशबोर्डचा वापर केला जातो. तो काही काळापूर्वी तसा लहान होता. आज प्लॅस्टिक वा तत्सम घटकांनी तयार केलेला प्रशस्त भाग दिसतो. त्या डॅशबोर्डवर वरच्या बाजूला अनेकांना काही ना काही वस्तू ठेवायची सवय लागलेली आहे. ती वस्तू घसरू नये म्हणून खास रबरी मॅटही बाजारात उपलब्ध झालेले दिसतात. मात्र डॅशबोर्डवर अशा प्रकारच्या वस्तू ठेवणे हे ड्रायव्हरच्यादृष्टीने योग्य नाही, ड्रायव्हिंग करताना अशा वस्तुंमुळे लक्ष विचलीत होणे वा अडथळा निरमाण होणे अशा प्रकाराबरोबरच अपघातही होऊ शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. या डॅशबोर्डमध्ये ओडोमीटर, स्पीडोमीटर, टॅकोमीटर, फ्युएल गेज आदी यंत्रणा बसवण्यात आल्या. त्यानंतर आजच्या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये त्याचे स्वरूप डिजिटलही झाले. तसेच म्युझिक सिस्टिम, बॅक कॅमेऱ्याचे स्क्रीन, सेन्सर्स अशा आवश्यक वस्तुंची स्थापना केली गेली. ते स्क्रूद्वारे वा खाचांद्वारे डॅशबोर्डमध्ये घट्ट बसवलेले असतात. चालकाला ते बाहेर येण्याची वा त्यातून काही पडण्याची भीती नसते. 

मात्र,  या डॅशबोर्डवर स्टिअरिंग व्हिलच्या वरच्या अंगाला असलेल्या सपाट व कधी तिरकस जागेचा वापर अनेकदा पेन, मोबाइल, चाव्या, पाण्याच्या बाटल्या, छत्री अशा वस्तू ठेवण्यासाठीही केला जातो. डॅशबोर्ड हे कारमध्ये असे सामान ठेवण्यासाठी असलेले टेबल नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. कारच्या वेगामध्ये त्या वस्तु हेलकावू शकतात, ब्रेक लागल्यानंतर वा वेग घेताना त्या पुढे बसलेल्या व्यक्तीच्या वा ड्रायव्हरच्या अंगावर घसरू शकतात. यामुळे कार चालवताना अनेकदा ड्रायव्हर वा त्याबाजूची व्यक्ती कसरत करतात. यामध्ये ड्रायव्हिंग करणार्याचे लक्ष विचलित होणे, वा त्यामुळे अपघात घडण्याची शक्यताही असते. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या डॅशबोर्डचा वापर करताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे.

संबंधित

समांतर रस्त्यावरुन जाणाऱ्या मोटारीने घेतला पेट
शिवाजीनगर येथे चाकूचा धाक दाखवून मोटार पळविली
टोयोटा कंपनीनं परत मागवल्या कार; 'हे' आहे कारण 
टॅक्सीचालक चालवत होता वाहनचोरीची टोळी; पोलिसांनी केला 'मीटर डाऊन'
टाटा नॅनोचे उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर? जून महिन्यात बनवली केवळ एक कार 

ऑटो कडून आणखी

फरारी ते जीप, जुलै महिन्यात लॉन्च होणार आहेत या आलिशान कार!
92 वर्षांची झाली Mercedes-Benz कंपनी, जाणून घ्या काही रोमांचक गोष्टी!
मूर्ती लहान, पण कीर्ती महान... Volvo XC40ची वेगळीच शान
Audi A3 Cabriolet review: राजेशाही थाट, धावते सुस्साट, Audi A3ची काही औरच बात
होंडाने भारतात लॉन्च केली शानदार अमेज कार, जाणून घ्या किंमत

आणखी वाचा