जागतिक संग्रहालय दिन : पर्यटन राजधानीतील ऐतिहासिक संग्रहालये पर्यटकांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 05:24 PM2019-05-18T17:24:48+5:302019-05-18T17:25:42+5:30

संग्रहालयांचा प्रचार व प्रसार करण्यात कमी पडतेय यंत्रणा

World Museum Day: Historical museums of tourist capital awaiting tourists | जागतिक संग्रहालय दिन : पर्यटन राजधानीतील ऐतिहासिक संग्रहालये पर्यटकांच्या प्रतीक्षेत

जागतिक संग्रहालय दिन : पर्यटन राजधानीतील ऐतिहासिक संग्रहालये पर्यटकांच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

औरंगाबाद : शालिवाहन राजवटीची समृद्धता उपभोगलेले आपले शहर इतिहासाच्या अनेक खाणाखुणा जपून आहे. इथल्या इतिहासप्रेमींनी गतकाळाचे वैभव सांगणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तू सांभाळल्या, जपल्या. आज या वस्तूंची संग्रहालयेही शहरात उभी आहेत; पण संग्रहालयांची ओळख निर्माण करण्यात यंत्रणा कमी पडल्यामुळे या ऐतिहासिकनगरीतील संग्रहालये अजूनही पर्यटकांच्या प्रतीक्षेतच आहेत.

१८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. औरंगाबादसारख्या ऐतिहासिक शहराच्या दृष्टीने तर या दिवसाचे महत्त्व अधिकच आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संग्रहालय, सोनेरी महाल परिसरातील राज्य पुरातत्व विभागाचे संग्रहालय, महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय अशी अतिशय समृद्ध वारसा जपणारी संग्रहालये सध्या शहरात आहेत. असे असतानाही तुरळक पर्यटक संग्रहालये पाहण्यासाठी येतात. कारण या शहरात संग्रहालये आहेत, हीच गोष्ट मुळात त्यांना माहिती नसते.

रेल्वेस्टेशन, बसस्थानक, विमानतळ यासारख्या ठिकाणी कोठेही पुरातन वस्तू संग्रहालयाबाबत माहिती देणारे फलकलावलेले नाहीत. एमटीडीसीच्या संकेतस्थळावरही या संग्रहालयांचा उल्लेख नाही. त्यामुळे पर्यटक इथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. विद्यापीठातील अतिशय संपन्न असणाऱ्या संग्रहालयात दरवर्षी १० हजारांच्या आसपास पर्यटक भेट देतात. दरवर्षी अजिंठा-वेरूळ लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. या ऐतिहासिक ठेवींबाबत शासन दरबारी असणारी अनास्था हेही यामागचे प्रमुख कारण आहे, असे म्हटले जाते.

संग्रहालयांची माहितीपुस्तिका तयार व्हावी
मुळात आपल्याकडच्या अजिंठा-वेरूळ या जगप्रसिद्ध स्थळांचीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटकांमध्ये नीट प्रसिद्धी होत नाही. असे असताना संग्रहालयांचा प्रचार आणि प्रसार करणे तर खूपच दूरचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संग्रहालयातील एकेक वस्तू पीएच.डी. करण्यासारखी आहे. या वस्तू जेव्हा पर्यटक पाहतात, तेव्हा ते आम्हाला सांगतात की या संग्रहालयांचा उल्लेख त्यांना पर्यटन विभागाच्या कोणत्याही पुस्तिकेत आढळलेला नाही. आपल्याकडील संग्रहालयांबाबत पर्यटकांना माहितीच नसते. त्यामुळे संग्रहालयांची योग्य माहितीपुस्तिका तयार करणे, एखादे संकेतस्थळ तयार करून त्यावर पुरेशी माहिती देणे यासारखे काम होण्याची गरज आहे. याशिवाय आपले शहर औद्योगिक दृष्ट्या पुढे आणण्याकडेच राजकारण्यांचा कल आहे. पर्यटनाच्या दृष्टीने शहराचा विकास करू पाहणारा नेता आपल्याक डे नाही. - दुलारी कुरेशी

विशेष उपक्रम आयोजित करावेत
प्रत्येक संग्रहालयांमध्ये ऐतिहासिक वस्तूंचा एक विशिष्ट ठेवा असतो. जो काही खास वेळेतच काढला जातो. उदाहरणार्थ दिल्ली येथील संग्रहालयात खास ‘निजाम ज्वेलरी’चे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात येते, जे वर्षातून काही दिवसच असते, असे काही उपक्रम आपल्या शहरातील संग्रहालयांमध्ये झाले पाहिजेत. शाळा, महाविद्यालयांच्या सहली येथे आवर्जून नेल्या पाहिजेत, तसेच ज्या संग्रहालयाचे जे वैशिष्ट्य असेल त्यावर भाष्य करणाऱ्या तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करणे, अशा उपक्रमांच्या माध्यमातून शहरातील संग्रहालयांचा प्रचार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. 
- शिवाकांत वाजपेयी, उपअधीक्षक,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

Web Title: World Museum Day: Historical museums of tourist capital awaiting tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.