ठळक मुद्देबैठकीअंती डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक वास्तू स्थळांभोवती असलेले सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. सर्व ऐतिहासिक वास्तूंची यादी पालिका १ नोव्हेंबरपर्यंत देणार आहे. त्यानंतर पुढील कामाला वेग येईल. 

औरंगाबाद : शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा. युनेस्कोद्वारे ते मानांकन शहराला मिळावे. यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत सोमवारी प्राथमिक आढावा बैठक झाली. बैठकीअंती डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक वास्तू स्थळांभोवती असलेले सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. 

शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरूनच येथील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि विकासाला निधी उपलब्ध होईल. शिवाय शहराचा पर्यटन निर्देशांक वाढेल. विभागीय आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, जागतिक वारसा स्थळांत औरंगाबाद शहराचा समावेश व्हावा, यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्याच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा केली. मनपा हद्दीमध्ये बीबीका मकबरा, औरंगाबाद लेण्यांचा समावेश आहे. १४२ ऐतिहासिक स्थळे शहरात आहेत. १२ ठिकाणे राज्य पुरातत्व विभागाकडे आहेत. तर काही ठिकाणे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहेत. 

ऐतिहासिक स्थळांलगत असलेली अतिक्रमणे, स्मार्ट सिटीचा होणारा फायदा, संवर्धनासाठी असलेले बजेट, ऐतिहासिक वास्तूंची सद्य:स्थिती काय आहे. देखभाल कोण व कशी करीत आहे. येथील सांस्कृतिक मूल्ये कशी आहेत. जीवनशैली, इतिहासातील महत्त्व याचा अहवाल युनेस्कोकडे पाठविण्यासाठी चांगल्या प्रेझेंटेशनची तयारी करावी लागणार आहे. अतिक्रमणमुक्त ऐतिहासिक वास्तू असल्याचे अहवालात नमूद करावे लागेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समिती शहरात पाहणी करील. समितीने समाधानकारक अहवाल दिला तर शहर जयपूरप्रमाणे ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा होईल. जयपूरचा अहवाल तीन दशकांत सहा वेळा गेला, तेव्हा कुठे यावर्षी त्या शहराला ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले. सोमवारी प्राथमिक चर्चा केली असून, सर्व ऐतिहासिक वास्तूंची यादी पालिका १ नोव्हेंबरपर्यंत देणार आहे. त्यानंतर पुढील कामाला वेग येईल. 

अतिक्रमण डिसेंबरपर्यंत काढा 
डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक वास्तूसभोवतालचे अतिक्रमण काढण्याचे आदेश डॉ.भापकर यांनी सोमवारी बैठकीत दिले. बैठकीला उपायुक्त वर्षा ठाकूर, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, मनपा उपायुक्त श्रीकृष्ण भालसिंग, नगररचना विभागाचे सहायक संचालक पी. एल. आलूरकर, एमटीडीसीचे अभियंता योगेश राणे, सहसंचालक अजित खंदारे यांची उपस्थिती होती. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.