कामगार रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 08:23 PM2018-12-24T20:23:27+5:302018-12-24T20:23:41+5:30

मुंबईच्या अंधेरी येथील ईएसआयसी (कामगार रुग्णालय) रुग्णालयाला आग लागून ६ जण मृत्युमुखी, तर तब्बल १५४ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ईएसआयसी प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर ईएसआयसीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने सोमवारी पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.

Worker's Hospital Safety Review | कामगार रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा

कामगार रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा

googlenewsNext

विभागीय पथक : मुंबईतील आगीच्या घटनेनंतर ईएसआयसीला जाग
वाळूज महानगर : मुंबईच्या अंधेरी येथील ईएसआयसी (कामगार रुग्णालय) रुग्णालयाला आग लागून ६ जण मृत्युमुखी, तर तब्बल १५४ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ईएसआयसी प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर ईएसआयसीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने सोमवारी पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.


वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना अल्पदरात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआयसी प्रशासनाने पंढरपूर येथे ईएसआयसीची मॉडेल डिस्पेन्सरी उभारली आहे. या इमारतीसाठी ५ कोटी ९१ लाख रुपये खर्च करून २०१२-१३ मध्ये इमारत बांधली. २०१५ मध्ये माजी केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालय सुरू झाल्यानंतर काही वर्षांत इमारतीच्या भिंतीला तडे जाऊन काचा व फरशा गळून पडायला सुरुवात झाली. यावर दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुन्हा लाखो रुपये खर्च केले, तरीही इमारतीची पडझड थांबलेली नाही. नोव्हेंबरमध्ये दिवाळीदरम्यान या रुग्णालयातील इंजेक्शन रूम व ड्रेसिंग रूमच्या मधल्या भिंतीला तडे जाऊन छत कोसळल्याची घटना घडली. प्रशासनाने हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून कमालीची गुप्तता पाळली होती; पण ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. येथील डॉ. व्यंकट जांभळे यांनी माहिती देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

त्यानंतर पुन्हा आठवडाभरापूर्वी सदरील भिंतीचे काही भागाचे छत पडल्याची घटना घडली. याच खोलीत रुग्णांना इंजेक्शन देऊन उपचार केले जातात, तसेच या रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणाही कार्यान्वित नाही. जनरेटर व लिफ्ट अनेक दिवसांपासून बंदावस्थेत आहे. बजाजनगरातील दवाखान्याची तर फारच वाईट अवस्था आहे. भिंतीला व छताला तडे गेल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. पंढरपूर व बजाजनगरातील दवाखान्यात कामगार रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी असते. रुग्णालयाच्या भिंतीचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने कामगारांसह डॉक्टरांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. अग्निशमन यंत्रणा धूळ खात पडल्याने रुग्णालयाला आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मुंबईतील घटनेनंतर जाग
मुंबई अंधेरी येथील घटनेमुळे ईएसआयसी प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने राज्यातील ईएसआयीसी रुग्णालयाच्या सुरक्षेची पाहणी मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी औरंगाबादच्या विभागीय कार्यालयाचे उपसंचालक संजीव यादव, शाखा प्रमुख पद्मनाभन दातार यांच्या पथकाने पंढरपूर येथील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी डॉ. व्यंकट, संतोष दळवी यांची उपस्थिती होती. या विषयी उपसंचालक यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

Web Title: Worker's Hospital Safety Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.