डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कोण होणार कुलगुरू ? इच्छुकांच्या भाऊगर्दीने चर्चेला उधाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:58 PM2019-05-09T18:58:58+5:302019-05-09T19:00:41+5:30

३० पेक्षा अधिक व्यक्तींनी अर्ज केल्याची माहिती

Who will be the Vice Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University? | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कोण होणार कुलगुरू ? इच्छुकांच्या भाऊगर्दीने चर्चेला उधाण 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कोण होणार कुलगुरू ? इच्छुकांच्या भाऊगर्दीने चर्चेला उधाण 

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता आणि प्रतीक्षा उच्चशिक्षण वर्तुळात लागली आहे. यातील विधि विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज मागविण्यात आले होते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी २२ मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांची निवड तामिळनाडूतील राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. काही महिन्यांपासून या विद्यापीठाचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी नवीन कुलगुरू निवडीसाठी समिती गठीत झाल्यानंतर समितीने अर्ज मागविले. १५ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. त्यात ३० पेक्षा अधिक व्यक्तींनी अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या विद्यापीठाची निवड समिती लवकरच कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणार आहे. यातून समितीने निवडलेल्या पाचपैकी एका व्यक्तीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती असलेले विद्यापीठाचे कुलपती करणार आहेत. यामुळे जून महिन्यात विधि विद्यापीठालाही नवीन कुलगुरू मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून रोजी पूर्ण होत आहे. या रिक्त होणाऱ्या कुलगुरूपदी नेमणूक करण्याची प्रक्रिया कुलपती कार्यालयाने सुरू केली आहे.

कुलगुरूंच्या निवडीसाठी तीन सदस्यीय समिती गठीत केली असून, या समितीने पदासाठी जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. २२ मेपर्यंत समितीकडे अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन मुलाखती घेण्यात येतील. त्यातून पाच जणांची शिफारस कुलपतींकडे केली जाईल. या पाचपैकी एकाची निवड कुलगुरूपदी होणार आहे. या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे.

विद्यापीठाच्या विविध विभागांत कार्यरत असलेले अनेक जण पहिल्यांदाच कुलगुरूपदासाठी अर्ज करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये डीएनए बारकोडींचे संचालक डॉ. गुलाब खेडकर, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गायकवाड आदींचा समावेश असल्याची चर्चा आहे. याशिवाय ऐनवेळी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, राज्याचे उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची दावेदारीसुद्धा दाखल होऊ शकते, असे बोलले जात आहे. यात कोण बाजी मारणार? याकडे उच्चशिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्याची जाण असणारा कुलगुरू हवा
औरंगाबाद शहरात विधि विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर कुलगुरूंनी विद्यापीठाच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. मात्र, तामिळनाडूतील कुलगुरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले. शासनाकडे जमिनीसह इतर निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला नाही. मात्र, मुंबई उच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती कार्यकारी समितीत असल्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन जमिनीचा प्रश्न मार्गी लावला. आता विद्यापीठाच्या उभारणीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मराठवाड्याविषयी तळमळ आणि जाण असणारी व्यक्ती कुलगुरू झाल्यास विद्यापीठाच्या उभारणीला वेग येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हीच परिस्थिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आहे. मराठवाड्यातील व्यक्ती कुलगुरू झाल्यास सत्ताधारी यंत्रणेचा आणि पदाधिकाऱ्यांचा दबाव झुगारून देऊ शकतात. त्यामुळे दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू हे मराठवाड्यातीलच असावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Who will be the Vice Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.