सातारा-देवळाईचा विकास निधी महापालिका केव्हा खर्च करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:56 PM2018-03-17T23:56:07+5:302018-03-17T23:56:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : सातारा-देवळाई भागातील ८.६७ कोटी ९३ हजार ७५१ रुपये विकास निधी व कराच्या स्वरूपात वर्ग ...

When will the development fund of Satara-Devlai be spent? | सातारा-देवळाईचा विकास निधी महापालिका केव्हा खर्च करणार?

सातारा-देवळाईचा विकास निधी महापालिका केव्हा खर्च करणार?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा-देवळाई भागातील ८.६७ कोटी ९३ हजार ७५१ रुपये विकास निधी व कराच्या स्वरूपात वर्ग केलेला जवळपास ४ कोटी असा एकूण पावणेतेरा कोटींचा निधी शिल्लक असतानाही महापालिका तो खर्च करीत नाही. मनपाच्या या चालढकल धोरणामुळे येथील रहिवाशांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हक्काचा निधी समस्या सोडविण्यासाठी नाही तर केव्हा खर्च करणार असा प्रश्न या भागातील सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
महापालिका हद्दीलगत असलेल्या २८ महसुली गावांकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नियुक्ती केली होती. सातारा-देवळाई सिडको झालर क्षेत्रात येत असल्याने या भागात रेखांकन व बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार सिडको प्रशासनाकडे होता.
दोन्ही महसूल भागातून विकास परवानगीचा जवळपास १३ कोटी ४७ लाख, ८ हजार ४२० रुपयांचा विविध सेवा-सुविधा विकास शुल्क सिडकोकडे जमा झाला होता. (सातारा महसुली क्षेत्रातून ९ कोटी २८ लाख ९७ हजार ८०२ रुपये, तर देवळाई महसुली क्षेत्रातून ४ कोटी १८ लाख १० हजार ६१८ रुपये.) दोन्ही महसुली क्षेत्राचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर सिडकोने महापालिकेकडील येणे असलेली रक्कम वजा करून ८ कोटी ६७ लाख ९३ हजार ७५१ एवढा निधी महापालिकेला दिला आहे, तर ग्रामपंचायतीकडे करापोटी जमा असलेले जवळपास ५ कोटी रुपये त्र्यंबक तुपे महापौर असताना महापालिकेला वर्ग करण्यात आले. कराच्या पैशातून एमआयटी कॉलेज ते सातारा गाव व एक अंतर्गत अशा दोन रस्त्यांचे काम करण्यात येत आहे, तर काही निधी देखभाल दुरुस्तीवर खर्च केला आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे; परंतु सिडकोने दिलेले ८ कोटी ६७ लाख ९३ हजार ७५१ रुपये महापालिकेच्या तिजोरीत तसेच पडून आहेत.
मुख्य प्रश्न तरी सुटतील
महापालिकेत समावेश झाल्यापासून या भागातील नागरी समस्या सुटण्याऐवजी त्यात अधिक भर पडली आहे. मुख्य रस्त्यासह अंतर्गत एकही रस्ता धड नाही. रस्त्यावर पथदिवे नाहीत. अजूनही नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ड्रेनेजलाईनची व्यवस्था नसल्याने घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर व रस्त्यावर साचते आहे. या समस्या अशाच राहिल्या तर पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होणार आहे. हा निधी खर्च केल्यास सातारा-देवळाई भागातील किमान रस्ते, लाईट हे प्रमुख प्रश्न तरी किमान सुटण्यास मदत होणार असून विकासाला चालना मिळणार आहे; पण महापालिका करोडो रुपयांचा निधी पडून असतानाही निधी खर्च करण्यास टाळाटाळ करीत आहे. मनपाच्या या चालढकल धोरणामुळे या भागातील रहिवाशांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या भागाचा पडून असलेला विकास निधी महापालिका कधी खर्च करणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
विकास निधी खर्च करावा ...
सातारा-देवळाईचे जमा असलेले विकास निधीचे साडेआठ कोटी सिडकोने महापालिकेला दिले आहेत. सातारा ग्रा.पं.ने कराचे ५ कोटीही वर्ग केले आहेत. हा निधी खर्च करून या भागातील समस्या सोडवावी यासाठी आधी सिडको आता महापालिकेला भांडत आहोत; पण सिडकोच्या अधिकाऱ्याप्रमाणे महापालिकेचे अधिकारीही या भागात विकास निधी खर्च करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, असे राजू नरवडे यांनी सांगितले.

Web Title: When will the development fund of Satara-Devlai be spent?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.