आमचं विद्यापीठ आम्ही वाचवूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:09 AM2018-07-19T01:09:54+5:302018-07-19T01:10:11+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने चालविलेला अनागोंदी कारभार मोडून काढत महामानवाच्या नावाने असलेले विद्यापीठ बदनामीपासून वाचविणार असल्याचा निर्धार दहापेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी बुधवारी व्यक्त केला.

We will save our University | आमचं विद्यापीठ आम्ही वाचवूच

आमचं विद्यापीठ आम्ही वाचवूच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने चालविलेला अनागोंदी कारभार मोडून काढत महामानवाच्या नावाने असलेले विद्यापीठ बदनामीपासून वाचविणार असल्याचा निर्धार दहापेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी बुधवारी व्यक्त केला. मागील आठवड्यात उघडकीस आलेले नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरण हा सर्व अनागोंदीचा कडेलोट असून, यापुढे लोकशाही मार्गाने प्रशासनाला धडा शिकविणार असल्याचेही यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले.
विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठ बचाव कृती समितीतर्फे बुधवारी दुपारी १ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात बामुक्टो, बामुक्टा, मुप्टा, महात्मा फुले समता परिषद, एसएफआय, राष्ट्रीय बंजारा परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रस, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठवाडा विकास कृती समिती, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, बीएड-बीएड कृती समिती, पुरोगामी शिक्षक संघटना या प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी सहभाग नोंदविला. यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यापरिषद सदस्य डॉ. प्रतिभा अहिरे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘सिबॉल आॅफ नॉलेज’चे प्रतीक आहेत. मात्र त्यांना एका विशिष्ट विचारसरणीच्या दावणीला बांधण्याचे काम स्वार्थापोटी कुलगुरू करीत आहेत. याशिवाय विद्यापीठात सुरू असलेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार हा महापुरुषांच्या नावाची बदनामी करणारा आहे. आता मराठवाड्यातील स्वाभिमानी माणूस हे सहन करणार नसल्याचे सांगितले. प्रा. सुनील मगरे म्हणाले, मागील वर्षभरापासून संघ विचारसरणीच्या तालावर कुलगुरू काम करीत आहेत. बाबासाहेबांना गुरू मानलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संघ विचारांच्या लोकांना बोलावले. यावरून समजून घ्या, विद्यापीठ कोण चालवते. हे सर्व बंद करण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही प्रा. मगरे यांनी केले. डॉ. स्मिता अवचार म्हणाल्या, मागील काही दिवसांपासून विद्यापीठातील प्राध्यापकांनाही काम करणे अवघड बनले आहे. याविरोधात कोणीही बोलायला तयार नाही. मात्र आता अती झाल्यामुळे त्याचा प्रतिकार करावाच लागणार आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, बामुक्टोचे डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ.विक्रम खिलारे, डॉ. शफी शेख, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. अशोक पवार, अ‍ॅड. संजय काळबांडे, अ‍ॅड. सुभाष राऊत, अक्षय पाटील, मयूर सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू , प्रशासनाच्या विरोधात दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राम चव्हाण, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, अभिजित देशमुख, डॉ. संभाजी वाघमारे, प्रा.शिवानंद भानुसे, डॉ. भारत खैरनार, प्रा.रमेश भुतेकर, सुनील राठोड, लोकेश कांबळे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: We will save our University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.