‘आम्ही पण माणसं आहोत’; जकात नाका परिसरात कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 05:05 PM2018-06-22T17:05:08+5:302018-06-22T17:07:34+5:30

नागरिकांना कचऱ्याचा त्रास होतो, मग आम्ही पण माणसंच आहोत ना... अशी संतापजनक आणि उद्विग्न करणारी प्रतिक्रिया मध्यवर्ती जकात नाका परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

'We Are Humans also'; Citizen stricken by dumping ground in the octroi naka area | ‘आम्ही पण माणसं आहोत’; जकात नाका परिसरात कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त 

‘आम्ही पण माणसं आहोत’; जकात नाका परिसरात कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त 

googlenewsNext

औरंगाबाद : मागील १२५ दिवसांपासून आम्ही कचऱ्याच्या दुर्गंधीने ग्रासलो आहोत. एकानंतर एक लहान मुलं आजारी पडू लागली आहेत. जेवायला बसले तर ताटात माशा घोंगावतात, दुर्गंधीने जेवणही जात नाही. इतर नागरिकांना कचऱ्याचा त्रास होतो, मग आम्ही पण माणसंच आहोत ना... अशी संतापजनक आणि उद्विग्न करणारी प्रतिक्रिया मध्यवर्ती जकात नाका परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

कचऱ्याच्या साचलेल्या डोंगरामुळे व त्यावर पडलेल्या पावसाने आता जगणे कठीण झाले आहे. मनपाने कचरा डेपो हटवावा किंवा आम्हाला दुसरीकडे घरकुल द्यावे, अशी मागणीही या परिसरातील नागरिक करू लागले आहेत. शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व कचरा कोंडीमुळे महानगरपालिकेने मध्यवर्ती जकात नाका परिसरात कचरा टाकणे सुरू केले. आता येथे बघता बघता कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. त्याची दुर्गंधी या परिसरात पसरली आहे. त्यातच या परिसरात सायंकाळी मच्छी बाजार भरतो.

दुर्गंधीमुळे शेजारील मनपाच्या घरकुलातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.  येथील लहान मुले आजारी पडत आहेत. सर्वत्र माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांचा धंदाही निम्म्यावर येऊन ठेपला आहे. एवढेच नव्हे तर कचऱ्याची दुर्गंधी एवढी पसरली आहे की स्मशानभूमीत पार्थिव घेऊन आलेले लोक १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबत नाहीत. विशेष म्हणजे आजूबाजूला कचऱ्याच्या ढिगाने वेढले असतानाही जकात नाक्यामधील मनपाचे कर्मचारी नाईलाजाने दुर्गंधी सहन करीत आपले काम करीत आहेत. सोमवारी सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसाने या परिसरातील कुजलेल्या कचऱ्याची उग्र दुर्गंधी पसरली आहे.

आमच्या प्रतिनिधीने या परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांशी संवाद साधला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. शहराच्या मध्य वस्तीतील हा भाग असल्याने येथे जास्त काळ कचरा डेपो  ठेवल्यास साथीचे आजार परिसरात पसरू शकतात, अशी भीतीही काहींनी व्यक्त केली. 

स्मशानभूमीत दुर्गंधी
कचऱ्यामुळे स्मशानभूमीत दुर्गंधी पसरली आहे. जिथे लोक पार्थिव आणल्यानंतर अर्ध्या तासात अग्नी संस्कार उरकतात तिथे आता १० मिनिटेही थांबत नाहीत. कधी पार्थिवाला अग्नी देतो आणि या दुर्गंधीतून निघून जातो, असेच लोक बोलून दाखवत आहेत. आम्हालाही स्मशानात राहणे कठीण झाले आहे. 
-सुनील गायकवाड, स्मशानजोगी

जगणे कठीण झाले
मागील १०० दिवसांपासून आम्ही कचऱ्याची दुर्गंधी सहन करीत आहोत. मात्र, सोमवारी झालेल्या पावसाने मध्यवर्ती जकात नाका येथील कचरा सडला आहे. उग्र वासाने जगणे कठीण झाले आहे. 
- अविनाश पगारे, रहिवासी 

कचरा डेपो हटवा
कचऱ्याच्या दुर्गंधीने जगणे कठीण झाले आहे. दुर्गंधीने डोके दुखते, अभ्यासही होत नाही. मनपाने दुसऱ्या भागातील नागरिकांचा विचार केला मग आमच्याही आरोग्याचा विचार करावा व कचरा डेपो येथून शहराबाहेर हलवावा.  -सना हसन मोहंमद

Web Title: 'We Are Humans also'; Citizen stricken by dumping ground in the octroi naka area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.