शेकडो दिंड्यांसह वारकऱ्यांचे पैठणमध्ये आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:42 AM2019-03-26T00:42:13+5:302019-03-26T00:43:01+5:30

नाथषष्ठी सोहळा : नाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून दिंड्या राहुट्यात विसावल्या

 Warkaris arrive in Paithan along with hundreds of Dindis | शेकडो दिंड्यांसह वारकऱ्यांचे पैठणमध्ये आगमन

शेकडो दिंड्यांसह वारकऱ्यांचे पैठणमध्ये आगमन

googlenewsNext

पैठण : नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टाळमृदंगाचा खणखणाट अन् ‘भानुदास एकनाथ’चा जयघोष करत उन, वाऱ्याची पर्वा न करता शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत दिंड्यांचे सोमवारी दुपारनंतर पैठण शहरात आगमन सुरू झाले. शेकडो दिंड्यांसह आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीने पैठणनगरी गजबजून गेली. शहरात दाखल होताच संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत नाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून दिंड्या आपापल्या राहुट्यात विसावत होत्या.
पैठण शहरात दिंड्या मुक्कामी थांबण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने यंदा वारकºयांना चांगल्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाही यात्रा मैदानात नाथ मंदिरालगत असलेले रहाटपाळणे तेथून काढून तेथे प्राधान्याने वारकºयांच्या दिंड्या व राहुट्यांना जागा देण्यात आली तर रहाटपाळणे पार्किंग मैदानात हलविण्यात आले आहेत. वारकºयांनी गोदावरीचे वाळवंट, यात्रा मैदान, दत्त मंदिर परिसर व शहरभर राहुट्या व फड उभारले.
नाथवंशजांकडून षष्ठीचे निमंत्रण
सोमवारी नाथवंशजांच्या वतीने षष्ठी सोहळ्यात सहभागी व्हावे म्हणून पांडुरंग भगवंतास अक्षत (निमंत्रण) दिले गेले. याचप्रमाणे षष्ठीतील मानकरी नाथोपाध्ये, संतकवी, अमृतराय संस्थान, भगवान गड, ह.भ.प. अंमळनेरकर महाराज यांनाही नाथवंशजांकडून अक्षत देऊन निमंत्रण देण्यात आले.
लक्ष्मी आईची पूजा
दुपारी नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी नाथ मंदिराच्या गोदावरी प्रवेशद्वारास लागून असलेल्या लक्ष्मीमातेची परंपरेनुसार पूजा केली. संत एकनाथ महाराज यांनी या लक्ष्मीमातेस बहिण मानले होते. षष्ठीचा सोहळा निर्विघ्न पार पडू दे, असे साकडे नाथवंशजांनी भगवान पांडुरंगासह लक्ष्मी देवीस घातले. लक्ष्मी आई माता यांची सर्व नाथवंशज मंडळींनी पूजा केली. यावेळी सुप्रिया गोसावी, अनुराधा गोसावी, मनवा गोसावी, सौख्यदा देशपांडे, योगिनी कुलकर्णी आदींसह नाथवंशज उपस्थित होते.
आज निर्याण दिंडी
मंगळवारी सकाळी ११वाजता षष्ठीची नाथवंशजांची निर्याण दिंडी गावातील नाथ मंदिरातून निघणार असून या दिंडीत अक्षत दिलेले सर्व मानकरी सहभागी होतात. दिंडी वाळवंटातून बाहेरील नाथ मंदिरात जाणार आहे. या ठिकाणी ‘अवघेचे त्रैलौक्य, आनंदाचे आता’ या अभंगावर कीर्तन होते.
विविध शासकीय कार्यालये, दवाखाना यात्रा मैदानात
वारकºयांना सेवा सुविधा देण्यासाठी यात्रा परिसरात नगर परिषदेने कार्यालय हलविले आहे. या कार्यालयातून सर्व सुत्रे हलविण्यात येत आहेत. तात्पुरते अस्थायी पोलीस कार्यालय सुध्दा यात्रा मैदानात स्थलांतरीत करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने यात्रा मैदानात दवाखाना सुरू केला आहे. पाण्याचे टँकरही यंदा मुबलक असल्याने सर्वांना वेळेवर पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले. मंदिरात दर्शन सुरळीत घेता यावे म्हणून संस्थानच्या वतीने संपूर्ण दर्शन रांगेस मंडप टाकण्यात आला आहे. सर्व दर्शन रांग सीसीटीव्हीच्या नजरेखाली ठेवण्यात आली असल्याचे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांनी सांगितले.

Web Title:  Warkaris arrive in Paithan along with hundreds of Dindis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.