Vice Chancellor B. A. Chopde's degree certificate was lost; Begampura police are in search | कुलगुरू बी. ए. चोपडे यांची पदवी हरवली; बेगमपुरा पोलीस घेत आहेत शोध
कुलगुरू बी. ए. चोपडे यांची पदवी हरवली; बेगमपुरा पोलीस घेत आहेत शोध

ठळक मुद्देकुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची ‘‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी कराड येथील महाविद्यालयातील आहे. या विषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. या विषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. वाराणसी येथील बनारस हिंदु विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याची बातमी नुकतीच आली होती. मात्र पुढे हे सर्व चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले. या चर्चेला आठवडा होताच आता कुलगुरूंची पदवी हरवली असल्याची माहिती समोर आली आहे. कुलगुरूंनी बेगमपूरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  ‘मी बाळू आनंदा चोपडे, वय ६१.५, व्यवसाय नोकरी, पत्ता- माननीय कुलगुरूंचे निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. सदर विषयी अपणास कळविण्यात येते की मला ‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी १९७४ साली कराड कॉलेज येथून मिळाली होती. सदरील २२ जानेवारी २०१८ रोजी विद्यापीठ परिसरात हरवली आहे. सदरी ही तक्रार आपणास देत आहे. करीता सदरील तक्रारी संदर्भात पुढील योग्य कार्यवाही करून सहकार्य करावे.’ यावरून पोलीसांनी प्रॉपर्टी मिसिंग नोंद केली असून, पोलीस हेड कॉन्सीटेबल एस.आर. पवार हे तपास करत आहेत. याविषयी डॉ. चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही याविषयी माहिती नसल्याचे सांगितले.

कुलगुरूंकडे देश-विदेशातील पदव्या
कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची ‘‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी कराड येथील महाविद्यालयातील आहे. तर त्यांनी शिवाजी विद्यापीठातुन १९७८ साली सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी मिळवली. १९८० मध्ये एमएसस्सीची पदवी मिळवली. यानंतर ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातुन पीएच. डी. पदवी प्राप्त केली. तर १९९६ साली अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातुन पोस्ट डॉक्टरेट पदवी मिळविलेली आहे.

सोशल मिडियावर तक्रार व्हायरल
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार तब्बल १० दिवसांनी उघडकीस आली. यानंतर ही तक्रार सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. शैक्षणिक वर्तुळातही याविषयी कुतुहलाने विचारणा होत आहे. कुलगुरूंची पदवी सापडणार की नाही, याविषयीही चर्चा  रंगली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.