जालना : शहरातील गांधी चमन भागात भरणाऱ्या रविवार बाजार तसेच बाजारपेठेत गत दोन अठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरण होत आहे. भाव कमी असल्याने सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषत: पालेभाज्यांच्या भावात चांगलीच घसरण झाली आहे. एरवी कोथंबीरची पाच रूपयांना असलेली जुडी पाच रूपयांत सात ते आठ जुड्या येत आहेत. सोबतच वांगे, कांदे तसेच बटाटे यांचे भाव १५ ते २० रूपये किलो दरम्यान आहेत. टोमॅटो भावात चांगलीच चढ- उतार होत आहे. चार ते पाच रूपये किलो टोमॅटो मिळत आहेत. तर कारला, दोडके, सिमला मिरची आदींची भावे २० ते ३० रूपये किलो दरम्यान आहे. फुल कोबी, पत्ता कोबी, गाजर, पालक, मेथी आदींचे भावही आटोक्यात आले आहेत.
रविवारी टोमॅटोची आठवडी बाजारात तीन क्विंटलची आवक झाली. वांगे ३ क्विंटल, सिमला मिरची एक ते दीड क्विंटल, मिरची दीड क्विंटल साधारणपणे रविवारचा बाजार आठवडी बाजार शहर परिसरात भरत असल्याने प्रत्येक भाज्यांची एक ते दोन क्विंटल दरम्यान आवक होत आहे.
रविवारच्या बाजारपेठेत जामवाडी, गोलापांगरी, इंदेवाडी, दावलवाडी, खादगाव, वाघू्रळ आदी भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. पाणी उपलब्ध असल्याने भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले आहे. यामुळे बाजारात आवक जास्त होत असून, भावात चढ-उतार होत असल्याचे वाघ्रूळ येथील भाजीपाला उत्पादक खरात यांनी सांगितले. हिवाळ्याचे काही दिवस भाज्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. विशेषत: हिरव्या पालेभाज्यांचे भाव घसरल्यो ते सांगतात. (प्रतिनिधी)