नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते निर्दोष, ३९ वर्षांपूर्वीचे प्रकरण, मुख्यमंत्र्यांचे अडविले होते वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:02 AM2017-11-02T01:02:42+5:302017-11-02T01:02:50+5:30

तत्कालीन मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ३९ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या वाहनांसमोर उड्या घेतलेल्या दलित पँथरच्या कार्यकर्त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी सोमवारी निर्दोष मुक्त केले.

Unmanned movement activists, innocent, 39-year-old cases, vehicles blocked by Chief Minister | नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते निर्दोष, ३९ वर्षांपूर्वीचे प्रकरण, मुख्यमंत्र्यांचे अडविले होते वाहन

नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते निर्दोष, ३९ वर्षांपूर्वीचे प्रकरण, मुख्यमंत्र्यांचे अडविले होते वाहन

googlenewsNext

औरंगाबाद : तत्कालीन मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ३९ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या वाहनांसमोर उड्या घेतलेल्या दलित पँथरच्या कार्यकर्त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी सोमवारी निर्दोष मुक्त केले.
तत्कालीन मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी दलित पँथरच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे १० एप्रिल १९७८ रोजी औरंगाबाद येथे आढावा बैठक घेण्यासाठी येणार असल्याची माहिती दलित पँथरचे कार्यकर्ते आणि महिलांना मिळाली.
वसंतदादांचे वाहन येताच गंगाधर गाडे, रतनकुमार पंडागळे, रमेशभाई खंडागळे, माणिक साळवे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर उड्या मारल्या. मुख्यमंत्र्यांचे वाहन अडवून दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीमार केला होता. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते.
तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद इनामदार यांनी दलित पँथरच्या ४१ कार्यकर्त्यांवर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल होते. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्याची सोमवारी अंतिम सुनावणी झाली. ४१ पैकी ११ पँथर कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ७ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश असल्याचे वकिलांनी निदर्शनास आणून दिले.
सुनावणीवेळी सबळ पुराव्याअभावी उर्वरित सर्व पँथर कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पँथर कार्यकर्त्यांतर्फे अ‍ॅड. संतोष पंडागळे, अ‍ॅड. सतीश सूर्यवंशी, अ‍ॅड. पी. एन. कांबळे, अ‍ॅड. सुमेध भिंगारदेव यांनी काम पाहिले.

Web Title: Unmanned movement activists, innocent, 39-year-old cases, vehicles blocked by Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.