विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:52 PM2019-04-06T16:52:06+5:302019-04-06T16:55:27+5:30

वारंवार परीक्षा संचालक बदलण्याचा फटका

University postgraduate examination for a second time | विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

googlenewsNext
ठळक मुद्देआता १० एप्रिलला सुरू होणार परीक्षापुनर्मूल्यांकनासाठी दाखल उत्तरपत्रिकांचा निकाल नाही

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ५ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी दाखल केलेल्या उत्तरपत्रिकांचा निकाल जाहीर केलेला नसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की दुसऱ्यांदा ओढावली आहे. सुधारित नियोजनानुसार १० एप्रिलपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षा २२ मार्चवरून २८ आणि २८ मार्चवरून ५ एप्रिलपर्यंत लांबविण्यात आल्या होत्या. पदवीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार २८ मार्चपासून सुरूझाल्या आहेत. मात्र सतत परीक्षा संचालक बदलणे, नवनियुक्त परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा यांना परीक्षेच्या नियोजनासाठी मिळालेला अल्प कालावधी, निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्तीवर गेलेले कर्मचारी, पूर्वीच्या परीक्षांचे रखडलेले निकाल, पुनर्मूल्यांकनाचा अद्यापही जाहीर न झालेला निकाल, यामुळे पदव्युत्तर परीक्षाचे नियोजन कोलमडले आहे. पदव्युत्तर परीक्षेची केवळ परीक्षा केंद्रे निश्चित झाली आहेत. पेपर सेटिंग, हॉल तिकीट वितरण आदी कामे अर्धवट असून, त्यासाठी थोडा अवधी लागणार असल्याचे परीक्षा संचालक डॉ. मंझा यांंनी परीक्षा मंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर पदव्युत्तरच्या परीक्षा ५ एप्रिलऐवजी १० एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीला परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा, सदस्य डॉ. गोविंद काळे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. मझहर फारुकी, डॉ. मुळे यांची उपस्थिती होती. 
सीईटीद्वारे प्रवेश मिळालेल्या परीक्षा २५ पासून
पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेल्या एम. ए., एम. कॉम., एम.एस्सी. या महाविद्यालयीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १० एप्रिलपासून  सुरू होणार आहेत. मात्र शासनाच्या सीईटीद्वारे प्रवेश देण्यात येत असलेल्या बी. एड., एम. एड., बी.पीएड., एम.पीएड. आणि विधि अभ्यासक्रमांच्या परीक्षा २५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमांचा अध्यापन कालावधी ९० दिवस पूर्ण होत नसल्यामुळे परीक्षा लांबविण्यात आल्या आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
..................
 

Web Title: University postgraduate examination for a second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.