फर्दापूर बसस्थानकात भरधाव ट्रक घुसला; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:46 AM2018-03-19T00:46:17+5:302018-03-19T00:46:45+5:30

जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील फर्दापूर बसस्थानकावरील दुकानांत भरधाव ट्रक घुसल्याने दोन जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता घडला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला.

 Truck fired at Ferdapur bus stand; Two killed | फर्दापूर बसस्थानकात भरधाव ट्रक घुसला; दोन ठार

फर्दापूर बसस्थानकात भरधाव ट्रक घुसला; दोन ठार

googlenewsNext

फर्दापूर : जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील फर्दापूर बसस्थानकावरील दुकानांत भरधाव ट्रक घुसल्याने दोन जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता घडला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला.
सिल्लोडकडून जळगावकडे मळी घेऊन जाणारा ट्रक (एमएच-२८, बी-७६२५) अजिंठा घाट उतरल्यानंतर भरधाव वेगाने येऊन येथील रस्त्यालगत असलेल्या बसस्थानकावरील दुकानात घुसला. प्रथम त्याने प्रेमचंद कोटिये यांच्या पादत्राणे दुकानाला धडक दिली. नंतर बाजूलाच असलेल्या बंद पोलीस चौकीचा चुराडा करून पोलीस चौकीशेजारील बंद असलेल्या महावीर बुक स्टॉलला धडक दिली. यात पोलीस चौकी व या दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले.
बसस्थानकावर गर्दी असल्याने या ट्रकखाली चिरडून युसूफ रशीद यादगारवाले (६५, रा. फर्दापूर/अजिंठा) हे जागीच ठार झाले, तर अजिंठा लेणीतील भारतीय पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र मन्नू मंगरुळे (७९, रा. फर्दापूर) व प्रेमचंद भागचंद कोटिये (रा. फर्दापूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यातील रामचंद्र मंगरुळे यांचा रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
फर्दापूर पोलीस ठाण्याचे पो.नि. शरद जºहाड, सपोनि. नीलेश घोरपडे, कर्मचारी बाजीराव धनवट, संदीप सुसर, राजू काकडे, सुनील भिवसने व ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य केले. पोकलेनच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला.
गतिरोधक नसल्याने अपघात वाढले
फर्दापूर हे जळगाव-औरंगाबाद महामार्गावर असल्याने शिवाय अजिंठा लेणीमुळे येथील बसस्थानकावर बाराही महिने पर्यटकांसह प्रवाशांची मोठी गर्दी असते; परंतु बसस्थानकावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगात येतात. यापूर्वीही असे अनेक अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण जखमी झालेले आहेत. सा.बां. विभागाकडे मागणी करूनही येथे गतिरोधक टाकले जात नाहीत. गेल्या वर्षीही या बसस्थानकावर ५ विद्यार्थी बसमध्ये बसत असताना बसला अशीच एका ट्रकने धडक दिली होती. त्यात हे विद्यार्थी जखमी झाले होते.
फोटो.....भरधाव ट्रक घुसल्याने फर्दापूर बसस्थानकावरील पोलीस चौकीचे मोठे नुकसान झाले.

Web Title:  Truck fired at Ferdapur bus stand; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.