लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : श्रावणी शनिवारनिमित्त खुलताबादेतील भद्रा मारुती आणि वेरूळ येथील घृष्णेश्वराचे दर्शन करून चिमुकलीसह औरंगाबादला परतणाºया दुचाकीस्वार दाम्पत्याला विरुद्ध दिशेने आलेल्या लष्कराच्या ट्रकने उडविले. या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा पती आणि साडेतीन वर्षांची चिमुकली जखमी झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास छावणीतील टोलनाक्याजवळ घडली.
दीपिका अविनाश तेजनकर (३०, रा. शहानूरमिया दर्गा परिसर, मूळ रा. मावसगव्हाण, ता.पैठण) असे मृत महिलेचे नाव आहे. मृताचा पती अविनाश शिवाजी तेजनकर (३५) आणि चिमुकली ईश्वरी यांचा जखमीत समावेश असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांगितले की, अविनाश तेजनकर हे महावितरण कंपनीत लिपिकपदावर कार्यरत आहेत. दुसºया शनिवारनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने तेजनकर हे आज सकाळीच देवदर्शनासाठी पत्नी दीपिका, साडेतीन वर्षीय चिमुकली ईश्वरी हिच्यासह वेरूळ येथील घृष्णेश्वर आणि खुलताबादेतील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीने गेले होते. वेरूळ येथे घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर या दाम्पत्याने छायाचित्रही काढले. त्यानंतर ते भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले. छावणी टोलनाक्यापासून पुढे स्मशानभूूमीजवळून ते जात असताना समोरून भरधाव आलेल्या मिल्ट्रीच्या ट्रकचालकाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात या दाम्पत्याला उडविल्यानंतर ट्रकचालक न थांबता तेथून वेगात मिल्ट्री एरियात निघून गेला. या भीषण घटनेत दीपिका या ट्रकखाली चिरडल्या गेल्याने घटनास्थळीच गतप्राण झाल्या. यावेळी अविनाश आणि ईश्वरी जखमी झाले. यावेळी तेथून जाणाºया वाहनचालकांनी अपघातग्रस्त दाम्पत्याच्या मदतीसाठी प्रयत्न केले आणि छावणी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, कर्मचारी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अ‍ॅम्ब्युलन्समधून प्रथम जखमी अविनाश आणि ईश्वरीला रुग्णालयात पाठविले. मृत दीपिका यांचे प्रेतही घाटीच्या शवागृहात हलविले.