उस्मानाबाद : कधी दुष्काळ, कधी गारपीठ, तर कधी अवकाळी पाऊस यामुळे मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने भरघोस उत्पादन मिळवून चार पैसे हाती राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र नोटाबंदी आणि मालाची वाढलेली आवक यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे चित्र आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर टोमॅटोसह इतर भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
परंडा तालुक्यातील ब्रह्मगाव येथून जाताना रस्त्याच्या कडेला टोमॅटोचा खच पडल्याचे दिसून येते. या परिसरात यंदा टोमॅटोसह भाजीपाल्याचे चांगले उत्पादन झाले आहे. पिकेही दमदार असल्याने चार पैसे सुटतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र पिके काढणीला आली असतानाच केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी झाल्याचे दिसून येते. ब्रह्मगाव येथील सुनील आहेर यांनी सुमारे दोन ते तीन ठिकाणी रस्त्याच्या कडेला टेंपोभर टोमॅटो खाली केल्याचे दिसून आले. या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोसह इतर नाशवंत भाजीपाला बाजारात नेण्याऐवजी रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे दिसून आले. याबाबत या शेतकऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, दोन एकर शेतात टोमॅटो लावले होते. बी-बियाण, मशागत, फवारणी आदी खर्च दीड लाखाच्या घरात गेला. पिकेही जोमदार आली आहे. मात्र बाजारपेठेत उठाव नाही.
व्यापारी दोन ते तीन रुपये किलोने टोमॅटो मागत आहेत. हेच टोमॅटो मार्केटमध्ये नेण्यासाठी तीन ते चार रुपये प्रति किलो खर्च येत असल्याने टोमॅटोसह इतर भाजीपाला फेकून देण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसात ७०० ते ८०० कॅरेट चांगल्या दर्जाच्या टोमॅटो निघाला आहे. मात्र सर्व टोमॅटो फेकून द्यावा लागल्याचे ब्रह्मगाव येथील सुनील अहिर यांनी सांगितले. अशीच परिस्थिती इतर शेतकऱ्यांवरही ओढावली असल्याचे त म्हणाले.