अजिंठा लेणीच्या पर्यटकांवर तिकिटांचा मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:26 AM2018-07-15T00:26:00+5:302018-07-15T00:28:35+5:30

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत प्रवेश करण्यापासून तर बाहेर पडेपर्यंत विविध सहा तिकिटांचा एकप्रकारे पर्यटकांवर मारा होत आहे. एक तिकिट घेत नाही तोच दुसरे तिकिट घेण्याची वेळ येते.

Tickets for Ajantha caves tourists hit | अजिंठा लेणीच्या पर्यटकांवर तिकिटांचा मारा

अजिंठा लेणीच्या पर्यटकांवर तिकिटांचा मारा

googlenewsNext
ठळक मुद्देवेगवेगळी सहा तिकिटे घेण्याची वेळ, एकाच तिकिटात सर्व समाविष्ट करा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत प्रवेश करण्यापासून तर बाहेर पडेपर्यंत विविध सहा तिकिटांचा एकप्रकारे पर्यटकांवर मारा होत आहे. एक तिकिट घेत नाही तोच दुसरे तिकिट घेण्याची वेळ येते. गर्दीमुळे त्यात बराच वेळ जात असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. वेगवेगळे तिकिट घेण्याऐवजी एकाच तिकिटात सर्व बाबी समाविष्ट करून लेणी पाहण्याचा आनंद सुसह्य क रण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.
अजिंठा लेणीस भेट देण्याकरिता दररोज हजारो पर्यटक येत असतात. यात देशभरासह विदेशी पर्यटकांची मोठी संख्या आहे. अवघड अशा वळणाचा घाट उतरून लेणीच्या रस्त्यावर प्रवेश करीत नाही तोच पर्यटकांचे वाहन अडविण्यात येते. या ठिकाणी प्रारंभी पार्किंग शुल्क आकारण्यात येते. पार्किंग शुल्काबरोबरच येथे सोयीसुविधा शुल्क म्हणून दहा रुपयांचे वेगळे तिकिट आकारले जाते. अनेकदा वाहनांच्या गर्दीने त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. ही दोन तिकिटे घेऊन रवाना झालेले पर्यटक पार्किंग परिसरात वाहन उभे करतात.
अजिंठा लेणी मार्गावर वाहनांना बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रदूषणमुक्त बस पकडावी लागते. त्यासाठी रांगेत उभे राहून २० रुपयांचे एसटी महामंडळाचे तिकिट घ्यावे लागते. तिकिट घेऊन पर्यटक लेणीच्या पायथ्यापर्यंत पोहोचतात. सुरक्षा तपासणी करून पर्यटक पुढे जातात, तेव्हा लेणीत प्रवेश करण्यासाठी ३० रुपयांचे तिकिट घ्यावे लागते. त्यामुळे पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ पर्यटकांवर येते. पर्यटकांच्या गर्दीमुळे हे तिकिट घेण्यासाठी बराच वेळ ताटकळावे लागते. ३० रुपयांचे तिकिट घेतल्यानंतर लेणीत प्रकाश शुल्क म्हणून आणखी एक तिकिट पर्यटकांपुढे सरकवले जाते. हे तिकिट अगदी पाच रुपयांचे आहे; परंतु या तिकिटावर हाताने पर्यटकाचे नाव लिहिले जाते. हे तिकिट घेईपर्यंत पाठीमागे रांगेत ताटकळलेले पर्यटक पुढे येण्याची कसरत करतात.
पार्किंग, सोयीसुविधा, बससेवा, लेणीत प्रवेश आणि प्रकाश (लायटिंग) शुल्क या पाच तिकिटांची कागदे खिशात ठेवून पर्यटक लेण्यांकडे रवाना होतात. लेणीत प्रवेश करताना मात्र एका तिकिटाची तपासणी होते. त्यामुळे इतर तिकिटांतून लेणीचे तिकिट शोधाशोध करण्यात पर्यटक व्यस्त होतात. तिकिट दाखवून पर्यटक लेणी पाहण्याचा आनंद घेतात. परतीच्या प्रवासाच्या वेळी पार्किंगपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा बसमधून प्रवास करावा लागतो. त्यामुळे सहावे तिकिट घेण्याची वेळ पर्यटकांवर येते. त्यासाठी रांगेत थांबण्याची वेळ ओढावते. लेणीत प्रवेश करण्यापासून तर बाहेर पडेपर्यंत सहा तिकिटांची कागदे सांभाळण्याची वेळ पर्यटकांवर येते. शुल्काबाबत पर्यटकांची ओरड नाही; परंतु वेगवेगळे तिकिटाऐवजी प्रवेश करतानाच सर्व बाबी एकाच तिकिटात समाविष्ट करण्याची मागणी होत आहे.
तिकिटांची संख्या अधिक
लेणी पाहण्यासाठी आलो; परंतु या ठिकाणी वेगवेगळे तिकिट घेण्याची वेळ येते. त्यात बराच वेळ जातो. लेणीत प्रवेश करण्यापासून तर बाहेर पडेपर्यंत सहा तिकिटे झाली. ज्या बाबींसाठी शुल्क आकारण्यात येते, ते एका तिकिटाच्या माध्यमातून घेता येईल. प्रवेश करतानाच एक तिकिट आकारले पाहिजे. त्यातून किमान तीन ठिकाणी पर्यटकांना रांगेत थांबण्याचा त्रास कमी होईल. -अभिनव पिंपळे, पर्यटक
ही आहेत तिकिट
वाहन पार्किंग शुल्क
सोयीसुविधा शुल्क
बससेवा तिकिट -२ (ये-जा करताना वेगवेगळी)
लेणी प्रवेश शुल्क.
प्रकाश (लायटिंग) शुल्क.

Web Title: Tickets for Ajantha caves tourists hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.